भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याची ओळख जगातील सर्वोत्तम अॅथलिट्सपैकी एक म्हणून केली जाते. ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारा तो एकमेव भारतीय आहे. आता नीरजने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. तो डायमंड लीग २०२५ च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेला आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत एकूण ७ खेळाडूंमध्ये नीरजचा समावेश झाला आहे.
विजेतेपदाच्या शर्यतीत नीरजसमोर ग्रेनेडाचा अँडरसन पीटर्स आणि जर्मनीचा ज्युलियन वेबर यांसारखे बलाढ्य प्रतिस्पर्धी असणार आहेत. या सामन्यांमध्ये नीरजची कामगिरी निर्णायक ठरणार आहे. भारतीय क्रीडाप्रेमींच्या आशा पुन्हा एकदा नीरजवर केंद्रित झाल्या आहेत. त्याच्यासह आणखी सहा आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे, ज्यात एड्रियन मार्डारे (मोल्डोव्हा), अँडरसन पीटर्स (ग्रेनेडा – गतविजेता), केशॉर्न वॉलकॉट (त्रिनिदाद आणि टोबॅगो), ज्युलियन वेबर (जर्मनी), ज्युलियस येगो (केनिया) आणि सायमन वाईलँड (स्वित्झर्लंड) यांचा समावेश आहे.
नीरज चोप्राने आपली शेवटची स्पर्धा ५ जुलै रोजी बेंगळुरू येथे पार पडलेल्या एनसी क्लासिकमध्ये खेळली. या स्पर्धेत त्याने ८६.१८ मीटरची भालाफेक करत विजेतेपद पटकावले. या हंगामात नीरजने एकूण ६ स्पर्धांमध्ये भाग घेतला, ज्यात ४ वेळा विजेतेपद आणि २ वेळा उपविजेतेपद मिळवले. आता त्याचे लक्ष्य १३ ते २१ सप्टेंबरदरम्यान टोकियोमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेवर आहे, जिथे तो आपले विजेतेपद राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.