नीरज चोप्रा बनला लेफ्टनंट कर्नल; २०१६ पासून भारतीय सैन्यात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 07:56 IST2025-10-23T07:55:15+5:302025-10-23T07:56:13+5:30
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला सैन्याने परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले.

नीरज चोप्रा बनला लेफ्टनंट कर्नल; २०१६ पासून भारतीय सैन्यात दाखल
नवी दिल्ली : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्राची भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल (मानद) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या एका समारंभात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्याला ही उपाधी प्रदान केली. त्याची आई सरोज देवी, वडील सतीश चोप्रा, काका भीम चोप्रा आणि पत्नी हिमानी मोर हे यावेळी उपस्थित होते.
हरियाणातील पानिपत येथील रहिवासी नीरज चोप्रा २६ ऑगस्ट २०१६ रोजी नायब सुभेदार म्हणून सैन्यात दाखल झाला. २०२१ मध्ये त्याला सुभेदार म्हणून बढती देण्यात आली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याला सैन्याने परम विशिष्ट सेवा पदक प्रदान केले.
२०२२ मध्ये नीरजला सुभेदार मेजर म्हणून बढती देण्यात आली होती. नीरज चोप्रा सध्या जगातील दुसऱ्या क्रमांकाचा भालाफेकपटू आहे. त्याने सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदके जिंकली आहेत. त्याने विश्व अजिंक्यपद, आशियाई तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदके जिंकली आहेत.
नीरजला २०१८ मध्ये अर्जुन पुरस्कार, २०२१ मध्ये खेलरत्न पुरस्कार आणि २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.