पश्चिम रेल्वेला नौदलाची धडक
By Admin | Updated: November 11, 2014 02:11 IST2014-11-11T02:11:22+5:302014-11-11T02:11:22+5:30
उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना भारतीय नौदलाने बलाढय़ पश्चिम रेल्वेला जोरदार धडक देताना 49व्या मुंबई सुवर्ण चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत ‘क’ गटात 4-3 अशी विजयी आगेकूच केली.

पश्चिम रेल्वेला नौदलाची धडक
मुंबई : उत्कृष्ट सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना भारतीय नौदलाने बलाढय़ पश्चिम रेल्वेला जोरदार धडक देताना 49व्या मुंबई सुवर्ण चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत ‘क’ गटात 4-3 अशी विजयी आगेकूच केली.
मुंबई हॉकी संघटनेच्या (एमएचएएल) वतीने संघटनेच्या चर्चगेट येथील स्टेडियमवर पार पडलेला हा सामना अत्यंत चुरशीचा व रंगतदार झाला. निर्णायक विजयाच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या नौदल संघाच्या खेळाडूंची देहबोली अत्यंत सकारात्मक दिसली. सुरुवातीपासूनच गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण करताना नौदलाने बलाढय़ पश्चिम रेल्वेला दडपणाखाली आणले.
अमित गोस्वामीने उजव्या बाजूने तुफान आक्रमण करताना 23व्या मिनिटाला मैदानी गोल करताना नौदलाला आघाडी मिळवून दिली. यानंतर 41व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर सत्कारणी लावताना नवीन कुमारने अप्रतिम गोल करीत नौदलाची आघाडी 2-क् अशी भक्कम केली. मात्र पश्चिम रेल्वेदेखील सहजासहजी हार मानण्यास तयार नव्हती. 43व्या मिनिटाला अमित रोहिदासने पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना रेल्वेची पिछाडी 1-2 अशी कमी केली.
मध्यांतरानंतर दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करताना सामन्याची रंगत वाढवली. मलक सिंगने 56व्या मिनिटाला रेल्वेचा दुसरा गोल करताना सामना 2-2 असा बरोबरीत आणला. या वेळी रेल्वे बाजी पलटवणार असे दिसत होते. मात्र नौदलाने जोरदार प्रत्युत्तर देताना मोक्याच्या वेळी रेल्वेची चेन खेचली. नवीन कुमार व मोहम्मद फहीम खान यांनी अनुक्रमे 62व्या व 64व्या मिनिटाला शानदार गोल करताना नौदलाला 4-2 अशा भक्कम आघाडीवर नेले. तर 69व्या मिनिटाला पुन्हा एकदा मलक सिंगने आपला हिसका दाखवताना शानदार गोल करीत रेल्वेचे आव्हान 3-4 असे जिवंत ठेवले. (क्रीडा प्रतिनिधी)