नावा क्रिकेट चषकात मटा विजेता
By Admin | Updated: January 6, 2015 00:50 IST2015-01-05T00:59:15+5:302015-01-06T00:50:42+5:30
लोकमतची उपांत्य फेरीपर्यंत धडक

नावा क्रिकेट चषकात मटा विजेता
लोकमतची उपांत्य फेरीपर्यंत धडक
नाशिक - नाशिक ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज वेल्फेअर असोसिएशन (नावा) व फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नावा चषक टी-टेन इंटर मीडिया क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद महाराष्ट्र टाइम्सच्या संघाने पटकावले़ पुण्यनगरीचा संघ उपविजेता राहिला़, तर लोकमतच्या संघाने कडवी लढत देत उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली़
फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर या स्पर्धेचे उद्घाटन आमदार सीमा हिरे व महेश हिरे यांच्या हस्ते झाले़ रंगतदार झालेल्या या स्पर्धेत लोकमतने पहिल्या सामन्यात रेडिओ मिर्ची संघाचा ९ धावांच्या फरकांनी पराभव केला़ प्रथम फलंदाजी करताना लोकमतने निर्धारित आठ षटकांत ५४ धावा केल्या होत्या़ तर मिर्चीच्या संघाचे पाच गडी बाद करत त्यांना ४६ धावांवर रोखत यश संपादन केले. तर साखळीतील दुसर्या सामन्यात लोकमतच्या संघाने यजमान नावाच्या संघाला पराभूत केले़ प्रथम फलंदाजी करताना लोकमत संघाने निर्धारित षटकात ७१ धावांचे लक्ष नावाच्या संघाला दिले होते़ रोमहर्षक झालेल्या सामन्यात लोकमतने नावाच्या संघाला १२ धावांनी पराभूत करत उपांत्य फेरीत धडक मारली़ या दोन्ही सामन्यांत लोकमतचा धनराज सामनावीराचा मानकरी ठरला़, तर त्यास साथ देताना कर्णधार गणेश धुरी व अशोक निसाळ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले़ उपांत्य फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र टाइम्स विरोधात प्रथम फलंदाजी करताना लोकमत संघाने ६९ धावांचे लक्ष त्यांच्यासमोर ठेवले होते़ अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात अखेर महाराष्ट्र टाइम्स संघाने ७ गडी राखत विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला़ अ व ब अशा दोन गटांत लोकमत - रेडिओ मिर्ची, दिव्य मराठी - लोकपर्याय, नॅशनल इलेक्ट्रॉनिक मीडिया - मटा, नावा - देशदूत, सीटी इलेक्ट्रॉनिक मीडिया - सकाळ, पुण्यनगरी - रेड एफएम यांचे सामने झाले़ यामधून अ गटातून महाराष्ट्र टाइम्स, तर ब गटातून सकाळविरुद्ध विजय मिळवत पुण्यनगरीच्या संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला़ महाराष्ट्र टाइम्स व पुण्यनगरी संघात अंतिम सामना होऊन यामध्ये महाराष्ट्र टाइम्सने विजेतेपद पटकावले़ या स्पर्धेचे मालिकावीराचा मान महाराष्ट्र टाइम्सच्या स्वप्नील महाजन याने पटकावला़ स्पर्धेचे रेफरी म्हणून शेखर घोष यांनी काम पाहिले़