राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 16:26 IST2025-07-23T16:25:40+5:302025-07-23T16:26:14+5:30
केंद्रीय क्रीडा मंत्री मानसुख मांडविया यांनी लोकसभेत हे विधेयक सादर केले.

राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
नवी दिल्ली: केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी बुधवारी(दि.२३) लोकसभेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ सादर केले. हे विधेयक भारतीय खेळांमध्ये पारदर्शकता, जबाबदारी आणि चांगल्या प्रशासनाच्या दिशेने एक मोठे पाऊल मानले जात आहे. या विधेयकाअंतर्गत, एक राष्ट्रीय क्रीडा मंडळ (NSB) तयार केले जाईल, ज्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सह राष्ट्रीय क्रीडा महासंघ (NSF) वर नियम बनवण्याचे आणि देखरेख करण्याचे व्यापक अधिकार असतील.
विधेयकात काय आहे?
या विधेयकात राष्ट्रीय क्रीडा महासंघांसाठी जबाबदारी प्रणाली स्थापित करण्याचा प्रस्ताव आहे. सर्व मान्यताप्राप्त क्रीडा महासंघांना केंद्र सरकारकडून निधी मिळविण्यासाठी NSB कडून मान्यता घ्यावी लागेल. NSB मध्ये एक अध्यक्ष आणि सदस्य असतील, ज्यांची नियुक्ती केंद्र सरकार करेल. यांना सार्वजनिक प्रशासन, क्रीडा प्रशासन, क्रीडा कायदा आणि संबंधित क्षेत्रात विशेष ज्ञान किंवा अनुभव असेल. त्यांची नियुक्ती कॅबिनेट सचिव किंवा क्रीडा सचिव, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक, दोन क्रीडा प्रशासक आणि द्रोणाचार्य, खेलरत्न किंवा अर्जुन पुरस्कार विजेते यांचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीवर होईल.
या विधेयकात राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद आहे, ज्याला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील. हे न्यायाधिकरण क्रीडा महासंघ आणि खेळाडूंशी संबंधित सर्व प्रकारचे वाद सोडवेल. न्यायाधिकरणाच्या निर्णयाला फक्त सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येईल. खेळांमध्ये दीर्घकाळ चालणाऱ्या कायदेशीर लढाया कमी करण्यासाठी आणि जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
बीसीसीआय देखील विधेयकाच्या कक्षेत
विशेष म्हणजे हे विधेयक बीसीसीआयला देखील आपल्या कक्षेत आणेल. हे आतापर्यंत सरकारी निधी न मिळाल्याचे कारण देऊन स्वायत्ततेचा दावा करत होते. २०२८ च्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला असल्याने, बीसीसीआयलादेखील या विधेयकाच्या नियमांचे पालन करावे लागेल. यासोबतच, सर्व मान्यताप्राप्त क्रीडा संस्था माहिती अधिकार (आरटीआय) कायद्याच्या कक्षेत येतील, ज्याला बीसीसीआय नेहमीच विरोध करत आला आहे.