कुडाळ : ४७ व्या राष्ट्रीय व आंतर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत विदर्भ आणि तामिळनाडू संघांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे सांघिक जेतेपद नावावर केले. विदर्भ संघाने पुरुष सांघिक गटात कर्नाटक संघावर विजय मिळवला. महिला आंतरराज्य सांघिक गटात गतविजेत्या तामिळनाडूने आपले वर्चस्व कायम राखताना अंतिम सामन्यात बिहारचा २-१ असा पराभव केला.
पुरुष गटात विदर्भाच्या निलेश बनसोड व गुल खान जोडीला कर्नाटकच्या शिव कुमार व अरुण कुमार जोडीने सरळ दोन सेटमध्ये १८-१६, २०-१६ असे सहज पराभूत करून आघाडी घेतली असतानाही एकेरीच्या दोनही सामन्यात कडव्या लढतीनंतर विदर्भने बाजी मारली. विदर्भच्या इर्शाद अहमदने पहिला सेट गमावल्यानंतरही ८-२५, २५-१८, २३-० असा विजय मिळवून सामना बरोबरीत आणला. दुसऱ्या लढतीमध्ये विदर्भच्या निखिल लोखंडेने कर्नाटकच्या एम. विनोदवर २५-१२,६-२२, २५-१५ असा विजय मिळवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत तेलंगणाच्या महम्मद वसीम व अश्विन कुमार जोडीने तामिळनाडूच्या जी गणेशन व डी डी त्यागराज जोडीसमोर सपशेल नांगी टाकली. त्यांचा २२-१९, २५-३ असा पराभव करत तामिळनाडूने सुरुवातीलाच आघाडी घेतली. मात्र तेलंगणाच्या एस आदित्यने तमिळनाडूच्या एम सुमनला २५-२, २५-१० असा तर तेलंगणाच्याच महम्मद अहमदने तामिळनाडूच्या टी कुमारला २५-१०, २५-५ अशी मात करत आपल्या संघाला तिसऱ्या क्रमांकाचे पदक मिळवून दिले.