कुडाळ : ४७ व्या वरिष्ठ राष्रीय कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यात विश्व विजेत्या प्रशांत मोरेने त्याचाच सहकारी झाहिर पाशाचा २-२५, २२-१८, २३-९ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे पुरुषांच्या उपांत्य सामन्यात विदर्भच्या इर्शाद अहमदने महाराष्ट्राच्या राजेश गोहीलवर चुरशीच्या लढतीत ९-२५, २३-१७, २५-५ अशी मात करत अंतिम फेरी गाठली. अखिल भारतीय कॅरम महासंघ आयोजित व महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम संघटनेच्या यजमानपदाखाली कुडाळ, सिंधुदुर्ग येथे ही स्पर्धा सुरु आहे.
महिला एकेरीत उपांत्य फेरीत जैन इरिगेशनच्या आयेशा महम्मदने सहकारी नीलम घोडकेला २५-१२, २५-५ असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात रश्मी कुमारीने एस अपूर्वाला २२-५, ९-२०, २०-१० असे पराभूत करून अंतिम फेरी गाठली. पुरुष वयस्कर एकेरी गटात उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या अस्लम चिकतेने एम पी एस सी बी च्या इ मुरलीला २५-२२, २५-७ असे हरवून अंतिम फेरी गाठली. तर दुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये महाराष्ट्राच्या शब्बीर खानाने जैन इरिगेशनच्या मनू बारियाला १८-१४, २५-१० असे पराभूत केले. महिला वयस्कर उपांत्य लढतीमध्ये महाराष्ट्र्राच्या मालती केळकरने महाराष्ट्राच्या शोभा कामतला २१-१८, १७-१३ असे हरवून अंतिम फेरीत मजल मारली. दुसऱ्या उपांत्य लढाईत महाराष्ट्राच्या रोझिना गोदादने नाबार्डच्या न्यांसी सीक्वेराचा २५-६, २१-५ असा पराभव केला.
एअर इंडिया व पेट्रोलियम स्पोर्ट्स बोर्डाला सांघिक विजेतेपद आंतर संस्था सांघिक पुरुष गटामध्ये एअर इंडियाने बाजी मारली. रिझर्व्ह बँकेच्या आंतर राष्ट्रीय खेळाडू झाहीर पाशाने एअर इंडियाच्या झैद अहमदला १५-९, २३-१७ असे सहज पराभूत करून संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु एअर इंडियाच्या अनुभवी विश्व् विजेत्या आर एम शंकरा व राष्ट्रीय विजेत्या एम नटराज जोडीने रिझर्व्ह बँकेच्या सूर्यप्रकाश व वी आकाश जोडीला २५-९, २५-१७ असे हरवून सामन्यात २-२- अशी बरोबरी केली. तिसऱ्या व महत्वाच्या लढतीत पहिल्यांदाच एअर इंडियाकडून खेळणाऱ्या संदीप दिवेने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याने विश्व् विजेत्या प्रशांत मोरेला पहिला सेट २५-२ असा सहज जिंकून संघाच्या विजयाकडे आगेकूच केली होती. परंतु प्रशांतने दुसरा सेट कसाबसा २३-२२ असा जिंकून सामना बरोबरीत आणला. तिसरा सेट अधिक रंगणार असा सर्वांचा अंदाज संदीपने फोल ठरविला आणि २५-४ असे सहज प्रशांतला पराभूत करून एअर इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत जैन इरिगेशनने विजय संपादन केला. त्याने बलाढ्य पेट्रोलियम संघाला २-१ असे हरविले.