नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ‘महाराष्ट्र केसरी’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 04:34 AM2020-01-08T04:34:10+5:302020-01-08T04:34:23+5:30

नाशिकचा ढाण्या वाघ हर्षवर्धन सदगीर याने आपलाच मित्र लातूरच्या शैलेश शेळकेला ३-२ गुणांनी नमवत राज्याच्या कुस्ती क्षेत्रातील ‘महाराष्ट्र केसरी’ हा सर्वोच्च किताब मंगळवारी पटकावला.

Nashik's Harshvardhan Sadgir 'Maharashtra Kesari' | नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ‘महाराष्ट्र केसरी’

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ‘महाराष्ट्र केसरी’

googlenewsNext

पुणे : नाशिकचा ढाण्या वाघ हर्षवर्धन सदगीर याने आपलाच मित्र लातूरच्या शैलेश शेळकेला ३-२ गुणांनी नमवत राज्याच्या कुस्ती क्षेत्रातील ‘महाराष्ट्र केसरी’ हा सर्वोच्च किताब मंगळवारी पटकावला. हजारो कुस्ती प्रेमींच्या साक्षीने हर्षवर्धनने पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र केसरी गदा जिंकण्याचा भीमपराक्रम केला.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली. अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलात प्रशिक्षण घेत असलेल्या या दोन्ही मल्लांमध्ये विजेतेपदासाठी चुरस रंगली होती. हर्षवर्धनने गादी विभागातून तर, शैलेशने माती विभागातून किताबी लढतीसाठी पात्रता मिळविली होती. दोन्ही मल्ल तुल्यबळ असले तरी, गादी अर्थात मॅटवर खेळण्याचा फायदा हषवर्धनला मिळाला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते चांदीची गदा विजेत्याला प्रदान करण्यात आली. खासदार श्रीनिवास पाटील, श्रीरंग बारणे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, कार्याध्यक्ष नामदेव मोहिते, परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अपेक्षित लढत रंगलीच नाही...
गादी आणि मागी विभागातील उपांत्य आणि अंतिम फेरी अतिशय रंगतदार ठरल्या होत्या. त्यामुळे किताबी लढत डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरेल, अशी अपेक्षा कुस्तीप्रेमींना होती. मात्र, दोन्ही मल्ल एकाच तालमीत एकत्र सराव करीत असल्याने त्यांना एकमेकांचे बलस्थान तसेच कच्चे दुवे चांगल्याप्रकारे माहित होते. यामुळे कोणीही दुसऱ्याला वरचढ होण्याची संधी देत नव्हता. परिणामी कुस्ती काहीशी नकारात्मक स्वरुपाची ठरली. अखेरचे २० सेकंद शिल्लक असताना हर्षवर्धनने घेतलेल्या २ निर्णायक गुणांचा अपवाद वगळता शैलेशला २ व हर्षवर्धनला १ गुण हा प्रतिस्पर्ध्याच्या नकारात्मक खेळामुळे मिळाला.


लढतीदरम्यान पंचांनी अनेकदा दोघांना सकारात्मक खेळ करण्याची ताकीद दिली. ताकीद मिळाल्यावर ३० सेकंदांच्या आत हर्षवर्धनला गुण घेणे आवश्यक होते. मात्र, यात तो अयशस्वी ठरला. परिणामत: शैलेशचे गुणाचे खाते उघडले गेले. नंतर काही वेळेत शैलेशच्या नकारात्मक खेळामुळे हर्षवर्धनला १ गुण मिळाला.
१-१ अशी बरोबरी असताना दोन्ही मल्ल गुण घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. निर्धारित वेळ संपण्याच्या मार्गावर असताना पुन्हा नकारात्मक खेळ केल्याने पंचांनी हर्षवर्धनच्या विरोधात गुण दिला.
एका गुणाने मागे पडलेल्या हर्षवर्धनने पुनरागमनासाठी सर्वस्व पणाला लावले. अखेरच्या २० सेकंदात तिहेरी पट काढून हर्षवर्धनने बाजी पलटविली. यावेळी घेतलेले २ गुण हे त्याचा किताब निश्चित करणारे ठरले.
>कुस्ती संपली, दोस्ती कायम!
किताबी लढतील पराभूत झाल्यामुळे ती संपल्यावर शैलेश निराश मन:स्थितीत होता. हे दोघे मित्रच अंंतिम लढतीत आमने सामने असणार, हे सोमवारी रात्री निश्चित झाल्यानंतर दोघांनीही ‘मित्र असलो तरी खुन्नसने किताबी लढत खेळू,’असे स्पष्ट केले होते. त्यानुसार दोघेही खुन्नसनेच खेळले. मात्र, लढत संपल्यावर हर्षवर्धनने शैलेशला खांद्यावर उचलून घेतले. शैलेशनेही मित्राच्या या कृतीला प्रसन्नपणे दाद दिली आणि आपली दोस्ती कायम असल्याची ग्वाही दिली. या दोन्ही मित्रांनी आखाड्याला फेरी मारताना हात जोडून उपस्थित हजारो कुस्तीप्रेमींना अभिवादन करताच स्टेडियममध्ये एकच जल्लोष झाला.
>प्रथमच ‘डोप टेस्ट’
या स्पर्धेदरम्यान ‘डोप टेस्ट’ व्हावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद त्यादृष्टीने प्रयत्नशील होती. परिषदेच्या पाठपुराव्यानंतर यंदा राष्ट्रीय अंमलीद्रव्य सेवनविरोधी समितीचे (नाडा) अधिकारी स्पर्धेला उपस्थित राहिले. त्यांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेच्या इतिहासातील ही पहिलीच डोप टेस्ट ठरली. ‘नाडा’कडून अहवाल आल्यावर तो जाहीर करण्यात येईल, अशी माहिती स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी बंकट यादव यांनी दिली.

>माती विभाग निकाल :
57 किलो : सुवर्ण : आबासाहेब अटकळे (सोलापूर जिल्हा), रौप्य : संतोष हिरुगडे (कोल्हापूर शहर). कांस्य : ओंकार लाड (कोल्हापूर जिल्हा).
61 किलो : सुवर्ण : सागर मारकड (पुणे जिल्हा). रौप्य : निखिल कदम (पुणे शहर). कांस्य : हनुमंत शिंदे (सोलापूर जिल्हा).
70किलो : सुवर्ण : नितिन पवार (कोल्हापूर शहर). रौप्य : मच्छिंद्र निवंगरे (कोल्हापूर जिल्हा). कांस्य : संतोष गावडे (सोलापूर).
74किलो : सुवर्ण : अनिल चव्हाण (कोल्हापूर). रौप्य : आबासाहेब मदने (सोलापूर जिल्हा). कांस्य : श्रीकांत निकम (सांगली).
79 किलो : सुवर्ण : हणमंत पुरी (उस्मानाबाद). रौप्य : सागर चौगुले (सोलापूर जिल्हा). कांस्य : धर्मा शिंदे (नाशिक).
86 किलो : सुवर्ण : प्रशांत जगताप (सोलापूर). रौप्य : आकाश भिंगारे (अहमदनगर). कांस्य : संतोष पडळकर (पुणे).
92 किलो : सुवर्ण : शुभम चव्हाण (सोलापूर जिल्हा). रौप्य : जयदीप गायकवड (सातारा). कांस्य : अमोल मुंढे (बीड).
97 किलो : सुवर्ण : विशाल बनकर (सोलापूर जिल्हा). रौप्य : सारंग सोनटक्के (मुंबई उपनगर). कांस्य : दीपक कराड (लातूर).
>गादी विभाग निकाल :
57 किलो : सुवर्ण : ज्योतिबा अटकळे (सोलापूर). रौप्य : रमेश इंगवले (कोल्हापूर). कांस्य : आतिष तोडकर (बीड), संकेत ठाकुर (पुणे शहर).
61 किलो : सुवर्ण : विजय पाटील (कोल्हापूर). रौप्य : सागर बरडे (नाशिक जिल्हा). कांस्य : अनुदान चव्हाण (पुणे शहर), सौरभ पाटील (कोल्हापूर शहर).
65 किलो : सुवर्ण : अक्षय हिरगुड (कोल्हापूर). रौप्य : देवानंद पवार (लातूर). कांस्य : भालचंद्र कुंभार (पुणे शहर), भाऊराव सदगीर (नाशिक जिल्हा).
70 किलो : सुवर्ण : कालीचरण सोलनकर (सोलापूर जिल्हा). रौप्य : दिनेश मोकाशी (पुणे जिल्हा). कांस्य : विकास गोरे (अहमदनगर), योगेश्वर तापकिर (पिंपरी-चिंचवड).
74 किलो : सुवर्ण : कुमार शेलार (कोल्हापूर जिल्हा). रौप्य : स्वप्निल काशीद (सोलापूर शहर). कांस्य : अमित सुळ (सोलापूर), राकेश तांबूटकर (कोल्हापूर).
79 किलो : सुवर्ण : रामचंद्र कांबळे (सोलापूर). रौप्य : रविंद्र खैरे (उस्मानाबाद). कांस्य : केवल भिंगारे (अहमदनगर), श्रीधर मुळीक (सातारा).
86 किलो : सुवर्ण : वेताळ शेळके (सोलापूर जिल्हा). रौप्य : बाबासाहेब चव्हाण (जालना). कांस्य : हर्षल गवते (धुळे).
92 किलो : सुवर्ण : पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर जिल्हा). रौप्य : प्रसाद सस्ते (पिंपरी-चिंचवड). कांस्य : भैरव माने (सोलापूर), सागर मोहोळ (पुणे शहर).
97 किलो : सुवर्ण : विकास सुळ (सातारा), रौप्य : सूरज मुलानी (सोलापूर), कांस्य : अरुण बोंगार्डे (कोल्हापूर शहर), अक्षय गरुड (मुंबई पूर्व).
सांघिक विजेतेपद
माती विभाग : सोलापूर जिल्हा (१९० गुण). उपविजेता : पुणे जिल्हा (८८ गुण)
गादी विभाग : सोलापूर जिल्हा (१७३ गुण). उपविजेता : कोल्हापूर जिल्हा (१३८ गुण)

Web Title: Nashik's Harshvardhan Sadgir 'Maharashtra Kesari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.