नरसिंगला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’
By Admin | Updated: August 4, 2016 12:18 IST2016-08-04T03:57:42+5:302016-08-04T12:18:43+5:30
डोपिंग टेस्टमध्ये अडकल्यानंतर उठलेल्या मोठ्या वादळाला यशस्वीपणे थोपवून भारताचा मल्ल नरसिंग यादव अखेर रिओ आॅलिम्पिकसाठी सज्ज झाला

नरसिंगला मिळाला ‘ग्रीन सिग्नल’
नवी दिल्ली : डोपिंग टेस्टमध्ये अडकल्यानंतर उठलेल्या मोठ्या वादळाला यशस्वीपणे थोपवून भारताचा मल्ल नरसिंग यादव अखेर रिओ आॅलिम्पिकसाठी सज्ज झाला आहे. ‘युनायटेड वर्ल्ड रेसलिंग’ अर्थात जागतिक कुस्ती संघटनेने (यूडब्ल्यूडब्ल्यू) नरसिंगला बुधवारी आॅलिम्पिकसाठी हिरवा झेंडा दाखवून भारतातील तमाम क्रीडाप्रेमींची अपेक्षापूर्ती केली.
उत्तेजक द्रव्य घेतल्याच्या आरोपामुळे नरसिंगवर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र याबाबत झालेल्या लांबलचक सुनावणीनंतर सोमवारी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंध संस्थेने (नाडा) त्याला क्लीन चिट देत मोठा दिलासा दिला होता. मात्र, आॅलिम्पिकमधील सहभागनिश्चितीसाठी नरसिंगला जागतिक कुस्ती संघटनेकडून परवानगी मिळणे अनिवार्य होते.
आॅलिम्पिकला सुरुवात होण्याच्या दोन दिवस आधी जागतिक कुस्ती संघटनेने स्पर्धेत सहभागी होण्यासाठी परवानगी दिल्यानंतर नरसिंगचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे. विशेष म्हणजे, भारतीय कुस्ती संघटेनेचे अध्यक्ष ब्रजभूषण शरणसिंग यांनी याबाबत शिक्कामोर्तब करताना सांगितले, ‘‘यूडब्ल्यूडब्ल्यूने अधिकृतपणे नरसिंगला रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे.’’ डोपिंगच्या आरोपातून निर्दोष मुक्त झाल्यानंतर नरसिंगला आॅलिम्पिकसाठी मान्यता मिळावी, यासाठी आपण जागतिक उत्तेजक प्रतिबंध संस्थेला (वाडा) आणि जागतिक कुस्ती संघटनेला पत्र लिहिणार असल्याचे ब्रजभूषण यांनी सांगितले होते. (वृत्तसंस्था)
>डोपिंगमध्ये अडकल्यानंतर नरसिंगने मिळवून दिलेला आॅलिम्पिक कोटा वाचविण्यासाठी भारताने तत्काळ त्याच्या जागी ७४ किलो वजनी गटात प्रवीण राणाची जागतिक कुस्ती संघटनेकडे शिफारस केली होती. या संघटनेने आता नरसिंगला ग्रीन सिग्नल दिल्याने अर्थातच राणाऐवजी नरसिंग ७४ किलो वजन गटात आपला दम दाखवणार आहे.
१९ आॅगस्टपासून पुरुषांच्या कुस्ती लढतीला सुरुवात होईल.
>‘वाडा’कडूनही चाचणी होणार?
जागतिक कुस्ती संघटनेने ग्रीन सिग्नल दिला असला, तरी जागतिक उत्तेजक प्रतिबंध संस्था (वाडा) पुन्हा एकदा नरसिंगची चाचणी घेणार असल्याचे कळते. ‘नाडा’कडून नरसिंगला मिळालेल्या क्लीन चिटबाबत असलेल्या संभ्रमामुळे ‘वाडा’ने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.