"वर्षाअखेर अव्वल तीनमध्ये येण्याचे माझे लक्ष्य"; भारताचा बॅडमिंटन स्टार चिराग शेट्टीचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 09:25 IST2025-01-28T09:24:30+5:302025-01-28T09:25:21+5:30
रविवारी मुंबईतील गोरेगाव स्पोर्टस क्लब बॅडमिंटन हॉलला चिरागचे नाव देण्यात आले. त्या निमित्ताने 'लोकमत'शी साधला विशेष संवाद

"वर्षाअखेर अव्वल तीनमध्ये येण्याचे माझे लक्ष्य"; भारताचा बॅडमिंटन स्टार चिराग शेट्टीचा निर्धार
रोहित नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: 'गेल्या वर्षी ऑलिम्पिकनंतर आम्ही केवळ एकच स्पर्धा खेळल्यामुळे जागतिक क्रमवारीत अव्वल तीनमधून थेट सातव्या-आठव्या स्थानी आलो. पण, यंदा वर्षाअखेर पुन्हा एकदा अव्वल तीनमध्ये येण्याचे आमचे लक्ष्य आहे,' असे भारताचा स्टार बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी याने 'लोकमत'ला सांगितले. रविवारी मुंबईतील गोरेगाव स्पोर्टस क्लब (जीएससी) येथील बॅडमिंटन हॉलला चिरागचे नाव देण्यात आले.
यावेळी, जीएससीचे अध्यक्ष डॉ. विनय जैन, संयुक्त सचिव संजय मालू, मानद सचिव राखी सोनीगिरा आणि चिरागचे प्रशिक्षक उदय पवार यांच्या उपस्थितीत चिरागला सन्मानित करण्यात आले. चिरागने यावेळी सांगितले की, 'ज्या कोर्टवर मी बॅडमिंटनचे धडे गिरवले, त्या कोर्टला माझे देण्यात आले. येथूनच २१ वर्षांपूर्वी माझा बॅडमिंटन प्रवास सुरू झाला होता. एक खेळाडू म्हणून माझ्यासाठी हा भावनिक क्षण आहे.'
नुकताच मलेशिया ओपन, इंडिया ओपन स्पर्धेत चिराग सात्त्विक साईराज रंकीरेड्डी यांना पुरुष दुहेरी उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला होता. चिरागने म्हणाला की, 'नक्कीच थोडी निराशा आहे; पण आम्ही दमदार पुनरागमन करू.
आम्ही सध्या नव्या प्रशिक्षकासोबत खेळत असल्याने ताळमेळ बसण्यास थोडा वेळ लागेल. पण, लवकरच आम्ही लय पकडू. आता आम्हाला आता ऑल इंग्लंड स्पर्धेचे वेध लागले असून, येथे जेतेपदाचे लक्ष्य बाळगले आहे. क्रमवारीकडे मी फारसे गंभीरतेने पाहत नाही, कारण प्रत्येक आठवड्यात क्रमवारी बदलत राहते. पण होय, अव्वल स्थानी येणं नक्कीच चांगले वाटते. आम्ही अव्वल स्थान गाठल्याचा आनंद अवर्णनीय होता. आता आमचे लक्ष्य पुन्हा अव्वल तीनमध्ये येण्याचे आहे.
-चिराग शेट्टी, बॅडमिंटनपटू