गतविजेत्याला मुंबईचे आव्हान
By Admin | Updated: March 3, 2015 01:56 IST2015-03-03T01:56:59+5:302015-03-03T01:56:59+5:30
यंदाच्या आय-लीग मोसमातील खराब सुरुवातीनंतर जबरदस्त फॉर्ममध्ये येत विजयी ट्रॅकवर आलेल्या मुंबई एफसी गतविजेत्या बंगळुरू एफसीला धक्का देण्यासाठी सज्ज आहे.

गतविजेत्याला मुंबईचे आव्हान
मुंबई : यंदाच्या आय-लीग मोसमातील खराब सुरुवातीनंतर जबरदस्त फॉर्ममध्ये येत विजयी ट्रॅकवर आलेल्या मुंबई एफसी गतविजेत्या बंगळुरू एफसीला धक्का देण्यासाठी सज्ज आहे. स्पर्धेतील ९व्या फेरीतील रंगणारा सामना कुलाबा येथील कुपरेज स्टेडियमवर रंगणार आहे.
स्पोर्टिंग क्लब दी गोवा संघाला ३-१ असे लोळवून आत्मविश्वास मिळवलेल्या बंगळुरू संघ मुंबईला त्यांच्याच मैदानात पराभूत करून गुणतालिकेत प्रथम स्थान काबीज करण्याचा विश्वास बाळगून आहे. मात्र सध्या विजयी घोडदौड करीत असलेल्या मुंबई एफसीचे कडवे आव्हान समोर असल्याची जाणीवदेखील बंगळुरू संघाला आहे.
तब्बल ५ वर्षांनंतर घरच्या मैदानावर परतलेल्या मुंबई एफसी संघाने अचानकपणे कात टाकली. घरच्या मैदानावर परतल्यापासून मुंबई संघ बलाढ्य वाटू लागला आहे. विशेष म्हणजे गेल्या चारही सामन्यांमध्ये मुंबई एफसी अपराजित राहिले असून या शानदार कामगिरीच्या जोरावर त्यांनी गुणतालिकेत तळाच्या स्थानावरून १० गुणांसह थेट सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. तर बंगळुरू संघ १३ गुणांसह तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. २०१० नंतर पहिल्यांदाच मुंबईने मोहन बागान, एअर इंडिया आणि पुणे एफसी यांना नमवून सलग ३ विजयांची नोंद केली आहे. त्यामुळे मुंबईचा हाच विजयी धडाका कायम राखण्यावर भर असेल. त्याचवेळी मंगळवारी होणाऱ्या सामन्यात खडतर आव्हान असल्याने विजयासाठी मुंबईला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. बंगळुरू संघाची कामगिरी घरच्या मैदानापेक्षा बाहेर कायमच चांगली झाली असल्याने मुंबईला तगडे आव्हान असेल. त्याचबरोबर बंगळुरूचा अव्वल खेळाडू सीन रुनी याने गोवा संघाविरुद्ध २ गोल करून जबरदस्त फॉर्म मिळवला असल्याने मुंबईला सावध राहावे लागेल. शिवाय सुनील छेत्रीसारख्या कसलेल्या खेळाडूमुळे बंगळुरूच्या आक्रमणाला आणखी धार आली आहे. (क्रीडा प्रतिनिधी)
ेमुंबई एफसीने मोसमातील निराशाजनक सुरुवातीनंतर जबरदस्त पुनरागमन करत इतर संघांना धोक्याचा इशारा दिला आहे. सध्या मुंबई गुणतालिकेत १० गुणांसह सहाव्या स्थानी आहे. जर का मंगळवारी मुंबईने बंगळुरूला धक्का देण्याची किमया केली तर मुंबईला आपले स्थान आणखी बळकट करता येईल. शिवाय घरच्या मैदानावरील शानदार कामगिरीमुळे आत्मविश्वास उंचावलेल्या मुंबईकडून बलाढ्य बंगळुरूला नक्कीच कडवी लढत मिळेल.
बंगळुरू संघ शारीरिक व मानसिकदृष्ट्या बलवान असून त्यांना नमवण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम खेळ करावाच लागेल.
- खालीद जमील, मुंबई एफसी - प्रशिक्षक
आतापर्यंत खेळल्या गेलेल्या टर्फच्या तुलनेत कुपरेज मैदानाचे टर्फ उत्तम दर्जाचे आहे. आमचा संघ पूर्णपणे तंदुरुस्त असून मुंबईविरुद्ध नक्कीच आम्ही यशस्वी कामगिरी करू. - अॅश्ले वेस्टवूड, बंगळुरू एफसी प्रशिक्षक