हाँग काँगमध्ये मुंबईकर वीरची भरारी

By Admin | Updated: August 4, 2014 02:51 IST2014-08-04T02:51:54+5:302014-08-04T02:51:54+5:30

येथे पार पडलेल्या हाँग काँग ज्युनिअर ओपन स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू वीर चोत्रानी आणि यश फडते यांनी १३ वर्षांखालील गटात अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली.

Mumbaikar Veerchi Bharari in Hong Kong | हाँग काँगमध्ये मुंबईकर वीरची भरारी

हाँग काँगमध्ये मुंबईकर वीरची भरारी

हाँग काँग : येथे पार पडलेल्या हाँग काँग ज्युनिअर ओपन स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू वीर चोत्रानी आणि यश फडते यांनी १३ वर्षांखालील गटात अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली. अव्वल मानांकित मुंबईच्या वीरने गोव्याच्या यशवर १४-१२, ८-११, ११-७, ११-८ असा विजय साजरा केला.
पहिल्या सेटमध्ये चुरशीची लढत देऊनही पराभव पत्करावा लागलेल्या यशने दुसऱ्या सेटमध्ये कमबॅक करीत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर वीरने दमदार खेळ करून पुढील दोन्ही सेट जिंकून सुवर्णपदकावर नाव कोरले. यशने नुकत्याच पार पडलेल्या एनएससीआय ओपन आणि जर्मनीत झालेल्या पायोनिअर चषक स्पर्धेत बाजी मारली होती. त्यामुळे त्याच्याकडून कडव्या झुंजीची अपेक्षा वर्तविण्यात येत होती. यशने झुंज दिली खरी, परंतु त्याला या वेळी यश मिळाले नाही. याआधी वीरने इराणमध्ये पार पडलेल्या २१व्या आशियाई ज्युनिअर वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीत यशला उपविजेतेपदावर समाधान मानण्यास भाग पाडले होते.
या दोन भारतीयांव्यतिरिक्त तुषार शहानी याने हाँग काँगमध्ये तिरंगा फडकवला. त्याने १५ वर्षांखालील गटात यजमान वाँग किंग येउंग अ‍ॅथनीचा ११-१, १५-१३, ११-८ असा सरळ सेटमध्ये पराभव करत सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेत कॅनडा, चायनीस तायपैइ, इजिप्त, इंग्लंड, भारत, जपान, कोरीआ, मकाऊ चायना, मलेशिया, सिंगापूर आदी १४ देशांतील ५३० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Mumbaikar Veerchi Bharari in Hong Kong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.