Mumbai Marathon 2019 : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 12:04 IST2019-01-20T09:47:40+5:302019-01-20T12:04:24+5:30
मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाही अपेक्षेप्रमाणे आफ्रिकन धावपटूंचे वर्चस्व राहिले. परूषांमध्ये केनियाच्या कॉलमस लॅगट याने, तर महिलांमध्ये इथियोपियाच्या वॉर्कनेश अलेमू हिने बाजी मारली.

Mumbai Marathon 2019 : केनियाच्या कॉसमस लॅगटने पटकावले मुंबई मॅरेथॉनचे विजेतेपद
- रोहित नाईक
मुंबई - मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाही अपेक्षेप्रमाणे आफ्रिकन धावपटूंचे वर्चस्व राहिले. पुरूषांमध्ये केनियाच्या कॉलमस लॅगट याने, तर महिलांमध्ये इथियोपियाच्या वॉर्कनेश अलेमू हिने बाजी मारली. त्याचवेळी भारतीयांमध्ये नितेंद्रसिंग रावत आणि सुधा सिंग यांनी अनुक्रमे पुरूष व महिला गटात वर्चस्व राखले.
यंदा अव्वल दहामध्ये एकाही भारतीय धावपटूंना स्थान मिळवता न आल्याने भारताची निराशा झाली. मुख्य मॅरेथॉनच्या पुरूष गटात केनियाच्या कॉसमस याने इथियोपियाच्या धावपटूंचे वर्चस्व मोडताना २:०९:१५ अशी बाजी मारली. आयच्यू बॅनटाय (२:१०:०५) आणि सुमेत अकलन्यू (२:१०:१४) या इथियोपियाच्या धावपटूंना अनुक्रमे रौप्य व कांस्य पटकावले.
महिलांमध्ये इथियोपियाच्या धावपटूंचा दबदबा राहिला. वॉर्कनेश अलेमू हिने अनपेक्षित निकाल नोंदवत गतविजेती अमाने गोबेना हिला मागे टाकले.
अलेमूने २:२५:४५ अशी वेळ नोंदवून बाजी मारली. अलेमूच्या धडाक्यापुढे गतविजेत्या गोबेना हिला २:२६:०९ अशा वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. इथियोपियाच्याच बिर्के देबेले हिने २:२६:३९ वेळेसह कांस्य जिंकले. त्याचवेळी एकूण क्रमवारीत भारताच्या सुधा सिंगने ८वे स्थान पटकावले.
भारतीय महिला गटात मध्य रेल्वेच्या सुधा सिंगने अपेक्षित वर्चस्व राखले. तिने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करताना २:३४:५६ अशी वेळ दिली.
सुधा सिंगने या कामगिरीसह जागतिक अजिंक्यपद स्पधेसाठी पात्रताही मिळवली. यासोबतच तिने मुंबई मॅरेथॉनचा जुना विक्रमही मोडीत काढला. महाराष्ट्रची ज्योती गवते २:४५:४८ वेळेसह दुसऱ्या स्थानी आली, तर जिगमेट डोलमानने ३:१०:४३ वेळेसह तिसरे स्थान मिळवले.
भारतीय पुरुषांमध्ये नितेंद्रसिंग रावत याने बाजी मारताना गतविजेत्या गोपी थोनकल याचे आव्हान परतावले. नितेंद्रसिंग याने २:१५:५२ अशी वेळ नोंदवून सुवर्ण यश मिळविले. गतविजेत्या गोपीला २:१७:०३ वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. करण सिंग याने २:२०:१० अशी वेळ देत कांस्य जिंकले.