मुंबई शहर संघाला सर्वसाधारण जेतेपद
By Admin | Updated: January 11, 2016 03:11 IST2016-01-11T03:11:30+5:302016-01-11T03:11:30+5:30
पुणे शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई शहर संघाने पुरुष व महिला गटात मिळून २४६ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले

मुंबई शहर संघाला सर्वसाधारण जेतेपद
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयात आयोजित महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत मुंबई शहर संघाने पुरुष व महिला गटात मिळून २४६ गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद संपादन केले. राज्य राखीव पोलीस बल संघाला १२७ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
राज्य राखीव पोलीस बल १च्या मैदानावर झालेल्या कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुरुष गटात कोल्हापूर रेंज संघाने कोकण रेंज संघाला, तर महिला गटात प्रशिक्षण संचालनालयाने मुंबई शहर संघाला नमवित जेतेपद मिळवले.
वानवडी येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) मैदानावर हा सामना झाला. पहिल्या डावात कोकण रेंज संघाने ८-७ अशी आघाडी घेतली. कोल्हापूर रेंजने दुसऱ्या डावात १०-९ अशी आघाडी घेत बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही संघांना पाच चढाया करण्याची संधी देण्यात आली. कोकणच्या एन.एच. ईस्वालकर, आर.सी. गमरे, बी.पी. ठाले, एस.एम. बेलेकर यांनी प्रत्येकी १ गुण मिळविला. कोल्हापूर रेंजच्या सुलतान डांगे, मंगेश भगत, स्वप्निल मोहिते यांनी प्रत्येकी १, तर रोहित बनेने २ गुण मिळवित संघाचा विजय साकार केला. महिला गटात प्रशिक्षण संचालनालयाने मुंबई शहर संघाला २१-१९ असे नमवित विजेतेपद मिळवले. पहिल्या डावात प्रशिक्षण संचालनालयाने १३-६ अशी भक्कम आघाडी घेत विजेतेपदाचा पाया घातला. दुसऱ्या डावात मुंबईने १३-८ अशी आघाडी घेत सामान्यत: पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पूर्वार्र्धातील ७ गुणांची पिछाडी निर्णायक ठरली. बास्केटबॉल स्पर्धेत महिला गटात अमरावती रेंज संघाने नागपूर रेंज संघाला २९-२४, तर पुरुष गटात मुंबई शहर संघाने कोल्हापूर रेंज संघाला ५६-४२ असे नमवित अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाला. या वेळी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, पुण्याचे आयुक्त के.के. पाठक, सहआयुक्त सुनील रामानंद उपस्थित होते.