श्रीनिवासन यांच्याविरोधात मोदी - पवारांची 'फिल्डींग'
By Admin | Updated: February 26, 2015 10:55 IST2015-02-26T10:52:07+5:302015-02-26T10:55:09+5:30
श्रीनिवासन व त्यांच्या समर्थकांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे.
श्रीनिवासन यांच्याविरोधात मोदी - पवारांची 'फिल्डींग'
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचे लढाई आता पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत पोहोचली आहे. श्रीनिवासन व त्यांच्या समर्थकांना अध्यक्षपदापासून दूर ठेवण्यासाठी शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली असून श्रीनिंची 'विकेट' घेण्यासंदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीत शरद पवारांनी श्रीनिवासन अथव त्यांच्या कट्टर समर्थकांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ देणार नाही असे मोदींना सांगितले. श्रीनिवासन यांना सुप्रीम कोर्टाने बीसीसीआच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास मज्जाव केला आहे. श्रीनिवासन यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे संजय पटेल यांना अध्यक्षपदी बसवण्याची रणनिती श्रीनिवासन यांनी आखली आहे. या माध्यमातून बीसीसीआयवरील वर्चस्व कायम राखण्याचे श्रीनिवासन यांचे मनसुबे आहेत. तर शरद पवार यांना श्रीनिवासन यांचे मनसुबे उधळून लावायचे आहेत.
श्रीनिवासन किंवा त्यांच्या समर्थकांना कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा देणार नाही असे पवारांनी मोदींना सांगितले आहे. जगातील सर्वात श्रीमंत बोर्डावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी भाजपा व पवार यांच्यात गुफ्तगू सुरु असल्याचे वृत्तात म्हटले आहे. भाजपाचा पाठिंबा असलेल्या कोणत्याही उमेदवाराला शरद पवारही समर्थन देतील अशी शक्यता आहे. संबंधीत उमेदवार हा राजकारणातला नसेल पण त्याचे भाजपा व राष्ट्रवादीशी सलोख्याचे संबंध असतील त्यालाच मैदानात उतरवले जाईल असे सूत्रांनी सांगितले. शरद पवार हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी इच्छूक नाही असेही सूत्रांनी स्पष्ट केले. राजकारणाच्या मैदानात एकमेकांना 'साथ' देऊन 'सबका विकास' साधणारे मोदी व पवार आता क्रिकेटच्या मैदानात कोणाचा विकास साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची निवडणूक २ मार्चला होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ मार्च आहे.