रोमांचक सामन्यात मेक्सिकोची बरोबरी
By Admin | Updated: June 17, 2015 01:59 IST2015-06-17T01:59:06+5:302015-06-17T01:59:06+5:30
अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात मेक्सिकोने चिलीला ३-३ अशा बरोबरीवर रोखले. याबरोबरच त्यांनी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले.

रोमांचक सामन्यात मेक्सिकोची बरोबरी
सेंटियागो : अत्यंत रोमांचक झालेल्या सामन्यात मेक्सिकोने चिलीला ३-३ अशा बरोबरीवर रोखले. याबरोबरच त्यांनी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत शानदार प्रदर्शन केले. दुसरीकडे, बोलिवियाने इक्वाडोरचा पराभव करीत उलटफेर केला. ‘अ’ गटातील सामन्यात बोलिवियाने इक्वाडोरवर ३-२ ने मात केली. स्पर्धेतील १८ वर्षांनंतरचा त्यांचा हा पहिला विजय आहे.
सेंटियागो येथे झालेल्या सामन्यात चिली आणि मेक्सिको यांच्यातील सामना चुरशीचा झाला. पहिल्या सामन्यात इक्वाडोरचा २-० ने पराभव करणाऱ्या चिलीने युवेंटसचा स्टार आरतुरो विडालच्या दोन गोलच्या बळावर ३-२ अशी आघाडी मिळवली होती. विन्सेंट वुओसोने ६६व्या मिनिटाला सामन्यातील आपला दुसरा गोल नोंदवत मेक्सिकोला बरोबरी साधून दिली.
त्याआधी, वुओसोने २१व्या मिनिटाला गोल नोंदवत मेक्सिकोला आघाडी मिळवून दिली होती. मात्र, त्यांची ही आघाडी अधिक वेळ टिकली नाही. एका मिनिटाच्या अंतरानेच विडालने हेडरद्वारे गोल नोंदवत बरोबरी साधली. त्यानंतर एटलेटिको दी माद्रीदचा स्ट्रायकर राउल जिमेनेजने २९व्या मिनिटाला गोल नोंदवून मेक्सिकोला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली होती. एडवर्डाे वर्गासने मध्यंतरानंतर गोल नोंदवून चिलीला २-२ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर ५५ व्या मिनिटाला विडालने पेनल्टीचे रूपांतर गोलमध्ये करीत पुन्हा आघाडी मिळवून दिली. मात्र, वुओसोने दुसरा गोल नोंदवत यजमानांच्या आशेवर पाणी फेरले. त्यानंतर ८०वे मिनीट चिलीसाठी दुर्भाग्याचे ठरले. त्यांना चांगली संधी मिळाली होती. एलेक्सिस सांचेजच्या वैध असलेल्या गोलला पंचांनी ‘आॅफ साइड’ असल्याचा निर्णय दिला.
मेक्सिको हा दक्षिण अमेरिका उपखंडातील कोपा अमेरिका स्पर्धेतील आमंत्रित संघ आहे. (वृत्तसंस्था)