जपानमध्ये मर्सिडिजचा हॅमिल्टन सुसाट!
By Admin | Updated: October 6, 2014 03:24 IST2014-10-06T03:13:32+5:302014-10-06T03:24:03+5:30
पावसाच्या दमदार एन्ट्रीत सुरू झालेल्या जपान ग्रांप्रीक्स स्पर्धेत मर्सिडीजच्या लुईस हॅमिल्टन याने बाजी मारीत सलग तिसरे जेतेपद पटकाविले.

जपानमध्ये मर्सिडिजचा हॅमिल्टन सुसाट!
सुजूका : पावसाच्या दमदार एन्ट्रीत सुरू झालेल्या जपान ग्रांप्रीक्स स्पर्धेत मर्सिडीजच्या लुईस हॅमिल्टन याने बाजी मारीत सलग तिसरे जेतेपद पटकाविले. हॅमिल्टनने १ तास ५१ मिनिटे ४३.०२१ सेकंदांची नोंद करीत बाजी मारली. मर्सिडीजच्याच निको रोसबर्गला (१:५१:५२.२०१) दुसऱ्या, तर रेड बुलच्या सिबॅस्टीयन वेटलला (१:५२:१२. १४३) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
५३ लॅपच्या या स्पर्धेत ४४ व्या लॅपमध्ये मरुसियाचा चालक ज्युलेस बियांची याच्या गाडीला अपघात झाला. त्यावेळी हॅमिल्टन आघाडीवर होता आणि आयोजकांनी स्पर्धा पुन्हा न घेण्याचा निर्णय घेत ४४व्या लॅपमध्येच रेस संपवून हॅमिल्टनला विजयी घोषित केले. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या निकोला पिछाडीवर टाकल्यानंतर रेसचा मनसोक्त आनंद लुटला. आमच्या संघासाठी हा चांगला निकाल आहे; परंतु बियांचीच्या प्रकृतीची चिंता वाटत असल्याचे, हॅमिल्टनने सांगितले. यंदाच्या हंगामाच्या आता चार फॉम्युर्ला वन शर्यती शिल्लक करून
हॅमिल्टन निकोपेक्षा १० गुणांनी आघाडीवर आहे.
सुरुवातीच्या नऊ लॅप्सवर पावसाचे वर्चस्व राहिल्याने चालकांनी वेगावर नियंत्रण ठेवला. पावसाने उघडीप घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने शर्यतीमधील चुरस पाहायला मिळाली. पोल पोझिशनपासून सुरुवात करणाऱ्या हॅमिल्टनने निर्विवाद वर्चस्व गाजविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला आणि त्यात तो यशस्वी ठरला. २९ व्या लॅपपर्यंत निको आघाडीवर होता. त्यामुळे हॅमिल्टन किंवा निको यांच्यापैकी एक जेतेपद पटकावेल, हे नक्की होते. (वृत्तसंस्था)