मॅक्सवेल-मिलर वादळ पुन्हा घोंघावणार?
By Admin | Updated: May 14, 2014 02:32 IST2014-05-14T02:32:45+5:302014-05-14T02:32:45+5:30
वादळाचा तडाखा म्हटले की वाताहत ही आलीच. यंदाच्या आयपीएलमध्ये असेच वादळ घोंघावत आहे. त्याचे नाव आहे ‘मॅक्सवेल-मिलर’ वादळ!

मॅक्सवेल-मिलर वादळ पुन्हा घोंघावणार?
आज लढत : सनरायजर्स किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध झुंजणार
हैदराबाद : वादळाचा तडाखा म्हटले की वाताहत ही आलीच. यंदाच्या आयपीएलमध्ये असेच वादळ घोंघावत आहे. त्याचे नाव आहे ‘मॅक्सवेल-मिलर’ वादळ! किंग्ज इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात असलेल्या या दोन फलंदाजांच्या रूपातील वादळ आता हैदराबादमध्ये दाखल झाले आहे. बुधवारी (दि. १४) यजमान सनरायजर्स हैदराबादविरुद्ध हे वादळ येऊ नये, अशीच इच्छा या संघाच्या चाहत्यांची असणार. मात्र, वादळ हे कोण्याच्या इच्छेवर नव्हे, तर आपल्या धुंदीत जगत असते. त्यामुळे मॅक्सवेल-मिलर यांच्या रूपातील वादळ उद्या घोंघावणार काय, याबाबत जगभरातील क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता आहे. राजीव गांधी स्टेडियमवर या सामन्याच्या निमित्ताने चौकार-षटकारांची आतषबाजी अनुभवण्याची सुवर्णसंधी हैदराबादवासीयांना मिळणार आहे. उद्या भिडणार्या दोन संघांपैकी ही लढत यजमान हैदराबादसाठी जास्त महत्त्वाची आहे. कारण हा संघ सध्या ९ सामन्यांत ४ विजय व ५ पराभव अशा कामगिरीसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. प्लेआॅफ फेरी गाठण्याच्या आशा कायम राखण्यासाठी या संघासाठी पंजाबविरुद्ध विजय मिळवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे या संघासमोर उद्या केवळ मॅक्सवेल-मिलर वादळाला रोखण्याचाच नव्हे, तर सामना जिंकण्यासाठी दबाव असेल. दुसरीकडे ७ विजय व २ पराभव, अशा प्रभावी कामगिरीसह अव्वल स्थानी असलेल्या पंजाबवर या लढतीत कोणताही दबाव नसेल. मॅक्सवेलबाबत काय सांगावे? ९ टी-२० सामन्यांत ४७४ धावा ही अचाट कामगिरी कोणत्याही संघाच्या उरात धडकी भरवण्यासाठी पुरेशी आहे. मिलरनेदेखील २९७ धावा फटकावून सर्व प्रतिस्पर्धी संघांना आपली दखल घ्यायला भाग पाडले आहे. सेहवाग फॉर्मात येत आहे. तो पूर्वीच्या लयीत आला, तर हैदराबादच्या गोलंदाजांचे उद्या काही खरे नाही. उद्याच्या लढतीसाठी हैदराबादवर काहीसा दबाव असला, तरी हा संघ धक्कादायक निकाल नोंदवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मागील लढतीत कोलकाता नाईट रायडर्सने पंजाबला लोळवण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे पंजाबला पराभूत करणे अशक्य नसल्याचा विश्वास हैदराबाद संघात नक्कीच निर्माण झाला असेल. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघातील २-३ महत्त्वाचे खेळाडू क्लिक झाल्यास पंजाबवर स्पर्धेतील तिसरा पराभव पत्करण्याची वेळ येऊ शकते. उद्या विजयाबरोबरच प्लेआॅफची आशा कायम ठेवण्यासाठी हैदराबादला २ गोष्टींची नितांत आवश्यकता असेल. एक पहिल्या षटकापासून पंजाबवर दबाव आणणे व दुसरे कामगिरीत सातत्य राखणे. (क्रीडा प्रतिनिधी)