मलेशियन मोटोजीपीमध्ये मारक्केजला जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 05:13 IST2018-11-05T05:12:41+5:302018-11-05T05:13:15+5:30
विश्व चॅम्पियन मार्क मारक्केजने चमकदार कामगिरी कायम राखताना रविवारी मलेशियन मोटोजीपीमध्ये जेतेपद पटकावले. त्याचे यंदाच्या मोसमातील हे नववे विजेतेपद आहे.

मलेशियन मोटोजीपीमध्ये मारक्केजला जेतेपद
- महेश मांदे
क्वालालम्पूर : विश्व चॅम्पियन मार्क मारक्केजने चमकदार कामगिरी कायम राखताना रविवारी मलेशियन मोटोजीपीमध्ये जेतेपद पटकावले. त्याचे यंदाच्या मोसमातील हे नववे विजेतेपद आहे.
मारक्केजचे कारकिर्दीतील हे ७० वे विजेतेपद आहे. मारक्केजने सातव्या स्थानापासून सुरुवात केली आणि त्याने झटपट दुसरे स्थान गाठले. दरम्यान वेलेंटिनो रोसीने आघाडी कायम राखली होती. शर्यतीचे चार लॅप्स शिल्लक असताना रोसीला १६ व्या लॅपच्या पहिल्या वळणावर नियंत्रण राखता आले नाही. त्यामुळे मारक्केजला आघाडी घेण्याची संधी मिळाली. त्याने ४०.३२.३७२ मिनिट वेळेसह शर्यत जिंकली. मारक्केजने यापूर्वी आॅक्टोबरमध्ये जपानमध्ये विश्वविजेतेपद पटकावले होते. होंडाचा त्याचा संघ सहकारी दानी पेडरोसा पाचव्या स्थानी राहिला. त्यामुळे होंडा संघ जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला.
जेतेपद पटकावल्यानंतर प्रतिक्रिया देताना मारक्केज म्हणाला,‘मी सातव्या स्थानापासून सुरुवात करणार असल्यामुळे ही कठीण शर्यत होती. मला चांगली सुरुवात करता आली नाही. पहिल्या लॅपमध्ये माझी कामगिरी चांगली झाली, पण सर्वोत्तम नव्हती. क्रमाक्रमाने मी एका-एका रायडरला पिछाडीवर सोडत दुसरे स्थान गाठले. वेलेंटिनोला गाठण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गाडीचा टायर हिट झाला. त्यामुळे नियंत्रण राखणे अवघड झाले होते. त्यामुळे त्यानंतर काही लॅप मी केवळ नियंत्रण राखण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, वेलेंटिनो आणि माझ्यादरम्यान असलेले अंतर कमी झाले आणि त्यामुळे मला अतिरिक्त प्रेरणा मिळाली. दरम्यान, वेलेंटिनोने एका वळणावर छोटी चूक केली. त्यानंतर मी संयम राखत शर्यत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि जेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरलो. मी जॉर्ज मार्टिन व पेक्को या सहकाऱ्यांचाही आभारी आहे. त्यामुळे चॅम्पियनशिप मिळवता आली.’
पाचव्या स्थानी असलेला डॅनी पेड्रोसा म्हणाला,‘मी आज सुरुवातीवर अधिक लक्ष केंद्रित केले होते. कारण ग्रीडमध्ये मी फार पिछाडीवर होतो. सुरुवात चांगली झाली नाही, पण त्यानंतर मी पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो.