डोपिंग नंतर मारियाचे दमदार पुनरागमन, दोन्ही सेटमध्ये पिछाडीवरुन जबरदस्त विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2017 20:05 IST2017-10-15T20:04:44+5:302017-10-15T20:05:06+5:30
रशियाच्या मारिया शारापोव्हाने तिआनजीन ओपन स्पर्धा जिंकताना महिला टेनिसच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय विजयांपैकी एक विजय नोंदवला.

डोपिंग नंतर मारियाचे दमदार पुनरागमन, दोन्ही सेटमध्ये पिछाडीवरुन जबरदस्त विजय
तिआनजीन- रशियाच्या मारिया शारापोव्हाने तिआनजीन ओपन स्पर्धा जिंकताना महिला टेनिसच्या इतिहासातील सर्वात अविस्मरणीय विजयांपैकी एक विजय नोंदवला. पहिल्या सेटमध्ये 1-4 आणि दुसऱ्या सेटमध्ये 1-5 अशी मागे पडल्यावर, एवढेच नाही तर तब्बल तीन पॉईंट गमावल्यावर अखेर चौथ्या पॉईंटवर तिने अंतिम सामना जिंकला. बेलारुसच्या एरिना साबालेंकाचा कडवा संघर्ष दोन तास पाच मिनिटात तिने 7-5, 7-6( 10-8) असा मोडून काढला.
एवढी कलाटणी महिला टेनिस इतिहासात क्वचितच कुणी अंतिम फेरीच्या सामन्याला दिली असेल. डोपिंग नंतर पुन्हा खेळायला लागल्यापासून मारियाचे हे पहिलेच विजेतेपद आहे.
या नाट्यमय सामन्यात माजी नंबर वन आणि पाच ग्रँड चॅम्पियन स्पर्धा विजेत्या मारियाने तरुण एरिना सबालेंका हिच्यावर 7-5, 7-6 (10-8) असा विजय मिळवला. अर्थात मारियासारख्या कसलेल्या खेळाडूला एवढी टक्कर देणाऱ्या एरिनाचेही कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. जागतिक क्रमवारीत 102 व्या स्थानी असलेल्या एरिनाने संपूर्ण सामन्यात मारियाला एक क्षणसुध्दा निवांत बसू दिले नाही. 19 वर्षीय एरिना प्रथमच डब्ल्यूटीए स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचली होती.
2015 च्या इटालियन ओपननंतरचे मारियाचे हे पहिलेच तर एकुण 36 वे अजिंक्यपद आहे. तब्बल अडीच वर्षानंतर तिने एखादी स्पर्धा जिंकली आहे. यंदा एप्रिलमधील पुनरागमनानंतर सातव्या स्पर्धेत प्रथमच तिच्या हाती विजेतेपदाची ट्रॉफी आली आहे.
बेलारुसच्या एरिनासोबतच्या या भन्नाट सामन्यात 11 सर्विस ब्रेक बघायला मिळाले. या सामन्याच्या पहिल्या सेटमधील सातवा गेम तब्बल नऊ मिनिटे रंगला. 1-4 अशी मागे पडल्यावर प्रशिक्षकाच्या सल्ल्याने बॉडी सर्व्ह तंत्र वापरणार्या मारियाने हा गेम जिंकला आणि एरिनाची सर्व्हिस भेदली. त्यानंतर संतापलेल्या एरिनाने तिसऱ्यांदा सर्विस गमावली. दुसऱ्या सेटमध्येही 1-5 पिछाडीवरुन मारियाने तीन ब्रेक मिळवत मुसंडी मारली.
या विजेतेपदामुळे मारिया शारापोव्हा जागतिक क्रमवारीत 86 व्या स्थानावरुन 57 व्या स्थानी झेपावणार आहे.