मारियाचा स्विसला धक्का
By Admin | Updated: July 2, 2014 02:56 IST2014-07-02T02:56:01+5:302014-07-02T02:56:01+5:30
लियोनेल मेस्सीच्या जादुई पासवर अतिरिक्त वेळेतील दोन मिनिटांचा वेळ शिल्लक असताना अर्जेंटिनाने मंगळवारी स्वित्झर्लंडचा १-० ने पराभव करीत फिफा विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली.

मारियाचा स्विसला धक्का
साओ पावलो : सुपर स्टार लियोनेल मेस्सीच्या जादुई पासवर अतिरिक्त वेळेतील दोन मिनिटांचा वेळ शिल्लक असताना एंजल डी मारियाने नोंदविलेल्या (११८ व्या मिनिटाला) गोल्डन गोलमुळे दोन वेळेचा चॅम्पियन अर्जेंटिनाने मंगळवारी स्वित्झर्लंडचा १-० ने पराभव करीत फिफा विश्वचषकाची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
क्षणोक्षणी उत्कंठा शिगेलो पोहोचविणाऱ्या या लढतीत निर्धारित वेळेत उभय संघ गोलशून्यने बरोबरीत राहील्यानंतर अतिरिक्त वेळ देण्यात आली. त्यात पहिल्या १५ मिनिटांच्या खेळात गोल होऊ शकला नव्हता. मेस्सी याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. विश्व क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेल्या अर्जेंटिना संघाने सहाव्या स्थानावरील स्वित्झर्लंडने निर्धारित ९० मिनिटांत चांगलेच झुंजवले.
चेंडूवर तब्बल ६२ टक्के नियंत्रण मिळवून देखील अर्जेंटिनाच्या खेळाडूंना चेंडू गोलजाळीत टाकणे जमलेच नाही. निकालाची कोंडी फोडण्यासाठी ३० मिनिटांना अतिरिक्त वेळ देण्यात आला. पहिल्या १५ मिनिटांचा खेळही गोलरहित झाला आणि दुसऱ्या १५ मिनिटांपैकी १३ मिनिटे संपताच सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटपर्यंत जाईल, असा अनेकांचा समज झाला होता. त्याचवेळी मेस्सीने करिष्मा सिद्ध केला. त्याने मारियोकडे शानदार पास दिला. मारियोने पहिल्याच प्रयत्नांत स्वित्झर्लंडच्या गोलकिपरला चकवित निर्णायक गोल नोंदविला.
स्वित्झर्लंडचा गोलकपिर दिएगो बेनेंझेलियो याने ११८ व्या मिनिटापर्यंत अर्जेंटिनाचे किमान सहा धोकादायक हल्ले परतवून लावले होते. पण मारियाचा .उत्कृष्ट शॉट त्याला रोखता आला नाही. त्याने सूर मारला पण वेध चुकल्याने चेंडू गोलजाळीत जावून विसावला. या गोलमुळे अर्जेंटिनाचे बाकावरील खेळाडू आणि उपस्थित हजारो चाहते आनंदात न्हाऊन निघाले. पण सामन्याचा निकाल अद्याप लागायचा होता.अतिरिक्त वेळेतही तीन मिनिटांचा इन्जुरी टाईम शिल्लक होता. स्वित्झर्लंडने अखेरचा प्रयत्न करीत अर्जेंटिनाच्या गोलफळीवर ताकदीनिशी हल्लाबोल केला. गोलकिपर स्वत: अन्य सहकाऱ्यांसह हल्ला करण्यात सहभागी झाला होता. बदली खेळाडू बलेरिम जेमेली याने शानदार हेडर मारलाही पण स्वित्झर्लंडचे दुर्दैव असे की हा हेडर गोलपोस्टला चाटून बाहेर जाताच बरोबरी साधण्याचा अखेरचा प्रयत्न फसल्याने संघाच्या पेनल्टी शूटआऊटमध्ये जाण्याच्या आशाही मावळल्या. पराभवामुळे स्वित्झर्लंडने ६० वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरी गाठण्याची संधी गमावली. १९५४ साली या संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली होती. त्यावेळी यजमानपदही त्यांनीच भूषविले होते. अर्जेंटिनाची बचाव फळी अभेद्द राहील्याने स्वित्झर्लंडच्या खेळाडूंचे सर्व प्रयत्न निष्प्रभ ठरले हे विशेष. (वृत्तसंस्था)