मलिका अंतिम फेरीत

By Admin | Updated: May 23, 2015 01:02 IST2015-05-23T01:02:14+5:302015-05-23T01:02:14+5:30

कसलेल्या भक्ती शाहचा २-० असा पराभव करून ९व्या रमेश देसाई स्मृती राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली.

Mallika in the final round | मलिका अंतिम फेरीत

मलिका अंतिम फेरीत

मुंबई : महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित मलिका मराठे हिने चमकदार आगेकूच कायम राखताना तेलंगणाच्या द्वितीय मानांकित कसलेल्या भक्ती शाहचा २-० असा पराभव करून ९व्या रमेश देसाई स्मृती राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. विजेतेपदासाठी तिच्यासमोर अनपेक्षित विजयांची मालिका गुंफणाऱ्या हरियाणाच्या संदीप्ती सिंगचे कडवे आव्हान असेल.
क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या १२ वर्षांखालील मुलींच्या गटाच्या मलिकाने एकतर्फी झालेल्या उपांत्य सामन्यात आक्रमक खेळाच्या जोरावर भक्तीला कोणतीही संधी न देता ६-३, ६-१ असे सहजपणे नमवले. तत्पूर्वी अटीतटीच्या झालेल्या उपांत्य सामन्यात पहिला सेट जिंकूनदेखील कामगिरीत सातत्य न राखल्याने महाराष्ट्राच्या गार्गी पवारला संदीप्तीच्या झुंजार खेळापुढे ६-१, १-६, ३-६ असा पराभव पत्करावा लागला.
मुलांच्या १२ वर्षांखालील गटात तेलंगणाच्या अव्वल मानांकित गौरव कुर्वाने आपल्या लौकिकानुसार खेळताना आंध्र प्रदेशच्या हासिथ सुरजनचा ६-०, ६-२ असा धुव्वा उडवून अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. यानंतर तामिळनाडूच्या द्वितीय मानांकित संदीप एस.ने देखील सहज आगेकूच करताना कर्नाटकच्या चौथ्या मानांकित निखिल थिरुमळेचा ६-०, ६-१ असा फडशा पाडला. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Mallika in the final round