Malaysia Open 2025 : बॅडमिंटनमधील भारताची नंबर वन जोडी सात्त्विक-चिराग उपांत्य फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 10:38 IST2025-01-11T10:35:18+5:302025-01-11T10:38:50+5:30
भारतीय जोडीने यजमान मलेशियाची जोडी ओंग येव सिन व तेओ ई यी यांचा ४९ मिनिटांत २६-२४, २१-१० असा पराभव केला.

Malaysia Open 2025 : बॅडमिंटनमधील भारताची नंबर वन जोडी सात्त्विक-चिराग उपांत्य फेरीत
क्वालालम्पुर : सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी शुक्रवारी मलेशिया ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या भारतीय जोडीने यजमान मलेशियाची जोडी ओंग येव सिन व तेओ ई यी यांचा ४९ मिनिटांत २६-२४, २१-१० असा पराभव केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारतीय जोडीने आक्रमक सुरुवात केली. चिरागने जोरदार क्रॉस-कोर्ट स्मॅशद्वारे सुरुवातीला आघाडी मिळवून दिली. तथापि, मलेशियाने जोरदार मुसंडी मारून बरोबरी साधली. अखेरच्या टप्प्यात बरोबरी होताच ताण वाढला. यानंतर सलग बॉडी स्मॅशमुळे सात्त्विक चिरागने पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सात्त्विक चिराग यांनी तुफानी खेळ करत बाजी मारली.
या बॅडमिंटन स्पर्धेच्या मागील हंगामात भारताच्या सुपरस्टार जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. यावेळी ही जोडी सेमीचा पल्ला पार करून पुन्हा एकदा फायनलमध्ये धडक मारत जेतेपद मिळवण्यासाठी जोर लावताना दिसेल. आज शनिवारी (११ जानेवारी) उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर दक्षिण कोरियाच्या वॉन हो किम आणि सेउंग जे सेओ यांचे आव्हान असेल.