छतगळतीमुळे बॅडमिंटन कोर्टवर 'खेळ'खंडोबा! भारतीय स्टार शटलरची मॅच थांबवण्याची आली वेळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 20:16 IST2025-01-07T20:13:11+5:302025-01-07T20:16:55+5:30
कोर्टवर पाणी जमा झाल्यामुळे अनेकदा ब्रेक घेतल्यावर अखेर सामना पुढच्या दिवशी जिथून थांबला तिथून पुढे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.

छतगळतीमुळे बॅडमिंटन कोर्टवर 'खेळ'खंडोबा! भारतीय स्टार शटलरची मॅच थांबवण्याची आली वेळ
मलेशिया ओपन २०२५ च्या स्पर्धेच्या माध्यमातून बॅडमिंटन नव्या वर्षातील नव्या सत्राचा शुभारंभ झाला आहे. पण भारतीय स्टार शटलरच्या पहिल्याच सामन्यात एक विचित्र सीन पाहायला मिळाला. मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथील एक्सियाटा एरिना स्टेडियमवर बॅडमिंटनचे मॅचेस खेळवण्यात येत आहे. ७ जानेवारी २०२५ पासून सुरु झालेल्या या स्पर्धेतील पहिल्या दिवशी आयोजकांची फजिती झाली. कारण छतगळतीमुळे सामन्यात आलेला व्यत्यय आणि त्यामुळे मॅच पुढे ढकलण्याचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत असा प्रकार होणं म्हणजे हास्यस्पदच आहे.
छतगळतीमुळे 'खेळ'खंडोबा
नव्या वर्षातील पहिली बॅडमिंटन स्पर्धा ज्या स्टेडियमवर खेळवण्यात आली त्या ठिकाणच्या कोर्ट २ आणि कोर्ट ३ वरील सामन्यात छतगळतीच्या समस्येमुळे खेळ खंडोबा झाल्याचे पाहायला मिळाले. या दोन्ही कोर्टवरील लढती थांबवण्यात आल्या. कोर्ट नंबर ३ वर भारतीय शटलर एचएस प्रणॉय विरुद्ध कॅनडाचा ब्रायन यंग यांच्यातील लढत सुरु होती. ही लढत छतगळतीमुळे थांबवण्यात आलेल्या लढतींपैकी एक आहे.
दुसऱ्या दिवसावर ढकलला सामना
मलेशिया ओपन स्पर्धेतील आपल्या पहिल्या फेरीतील लढतीत भारताच्या प्रणॉय रॉय याने पहिला सेट २१-१२ असा जिंकला होता. दुसऱ्या सेटमध्ये तो ६-३ अशा आघाडीवर असताना ही मॅच शेवटी थांबवण्यात आली. कोर्टवर पाणी जमा झाल्यामुळे अनेकदा ब्रेक घेतल्यावर अखेर सामना पुढच्या दिवशी जिथून थांबला तिथून पुढे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
१२.४३ कोटींच्या बक्षीसांची स्पर्धा अन् गळत्या छताखाली खेळवलीये स्पर्धा
छतगळतीमुळे कोर्टवर पाणी पडत असल्याची पहिली तक्रार ही कॅनडाच्या खेळाडूनं केली होती. पण त्यानंतरही ही मॅच सुरु ठेवण्यात आली होती. दुसऱ्या वेळी प्रणॉय रॉयनं आक्षेप नोंदवत पाणी पडणाऱ्या कोर्टवर खेळणं जोखीम निर्माण करणारे आहे, असे सांगितले. शेवटी मॅच पुढे ढकलण्यात आली. १२.४३ कोटी रुपयांची बक्षीस असणाऱ्या स्पर्धेत छतगळतीमुळे मॅच पुढे ढकलण्यात आल्यामुळे आयोजकांची चांगलीच फजिती झाली आहे. सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेचा विषय ठरतोय.