जयवर्धने, संगकाराला पराभवाने निरोप
By Admin | Updated: March 18, 2015 23:27 IST2015-03-18T23:27:35+5:302015-03-18T23:27:35+5:30
श्रीलंकेचे अनुभवी खेळाडू माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले़

जयवर्धने, संगकाराला पराभवाने निरोप
सिडनी : श्रीलंकेचे अनुभवी खेळाडू माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले़ वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे या वरिष्ठ खेळाडूंच्या वन-डे कारकिर्दीचा पराभवाने अखेर झाला़ संगकारा आणि जयवर्धने यांनी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीच निवृत्तीची घोषणा केली होती़
या लढतीपूर्वी सलग ४ शतके झळकावून वर्ल्डकपमध्ये आपली नवी ओळख निर्माण करणारा संगकारा आफ्रिकेविरुद्ध ४५ धावांची खेळी करू शकला़ हा संघ ३७़२ षटकांत अवघ्या १३३ धावांत तंबूत परतला़ सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये संगकाराने ५४१ कुटल्या आहेत़ सध्या तो वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे़
लंकेच्या माहेला जयवर्धनेने यापूर्वीच कसोटी क्रिकेटला अलविदा केले आहे़ आता हा खेळाडू वन-डे सामन्यातूनही निवृत्त झाला़ त्याने १९ शतके आणि ७७ अर्धशतकांसह ४४८ वन-डे सामन्यांमध्ये १२,६५० धावा केल्या आहेत़ मात्र, जयवर्धनेला सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करता आली नाही़ त्याला केवळ अफगाणिस्तानविरुद्धच शतकी खेळी करता आली होती़
१९९७मध्ये जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तेव्हा मी इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करीन, असे वाटले नव्हते़ मात्र, आज श्रीलंका क्रिकेटमध्ये मला जे स्थान आहे, त्याचा अभिमान आहे़
- माहेला जयवर्धने
महत्त्वाच्या सामन्यात आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, याची खंत आहे़ उच्च शिखरावर असताना कारकिर्दीची अखेर व्हावी, असे प्रत्येक खेळाडूला वाटते़ मात्र, प्रत्येक वेळी असे होत नाही़ असे असले, तरी मी देशासाठी दिलेल्या योगदानावर समाधानी आहे़
- कुमार संगकारा,