महाराष्ट्राचे दुहेरी विजेतेपद

By Admin | Updated: October 27, 2015 02:12 IST2015-10-27T02:12:51+5:302015-10-27T02:12:51+5:30

ओडिसा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३५व्या कुमार व मुली (१८ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद खो - खो स्पर्धेत महाराष्ट्राने आपला दबदबा राखला.

Maharashtra's double title | महाराष्ट्राचे दुहेरी विजेतेपद

महाराष्ट्राचे दुहेरी विजेतेपद

मुंबई : ओडिसा येथे नुकत्याच संपन्न झालेल्या ३५व्या कुमार व मुली (१८ वर्षांखालील) राष्ट्रीय अजिंक्यपद खो - खो स्पर्धेत महाराष्ट्राने आपला दबदबा राखला. कुमार व मुलींच्या संघाने आपापल्या गटांत विजेतेपदाला गवसणी घातल्याने महाराष्ट्राने स्पर्धेत दुहेरी विजेतेपदाची कमाई केली.
मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राला विजेतेपदासाठी कर्नाटकच्या कडव्या झुंजीस सामोरे जावे लागले. केवळ २ गुणांच्या आधारे बाजी मारलेल्या महाराष्ट्राने कर्नाटकचे आव्हान (४-३, ४-३) ८-६ असे परतावले. प्रथम संरक्षण करताना कर्नाटकने महाराष्ट्राला चांगलेच पळवले. मात्र महाराष्ट्राने त्याच तोडीचा खेळ करून पहिल्या डावात एका गुणाने ४-३ अशी नाममात्र आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही याच गुणसंख्येची पुनरावृत्ती झाल्याने महाराष्ट्राच्या मुलींनी २ गुणांनी बाजी मारली. प्रियंका भोपीचे जबरदस्त संरक्षण महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक ठरले. काजल भोर, प्रणाली बेनके व निकिता भुजबळ यांनीही मोलाचे योगदान दिले. कर्नाटककडून मेघा के. एस. आणि पल्लवी बी. यांनी अपयशी लढत दिली.
दुसऱ्या बाजूला कुमार गटात महाराष्ट्राने बलाढ्य केरळचा २ गुण व २ मिनिटे राखून १७-१५ असा सहज पराभव केला.
मध्यांतराला महाराष्ट्राने केवळ २ गुणांची आघाडी घेताना सामन्यावर १०-८ असे नियंत्रण राखले. मात्र हीच आघाडी अखेर निर्णायक ठरवताना दुसऱ्या डावात ७-७ अशी बरोबरी साधून महाराष्ट्राने बाजी
मारली.

Web Title: Maharashtra's double title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.