पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धेची अंतिम लढत चांगलीच अटीतटीची झाली. कारण या सामन्यात पहिला गुण शैलेश शेळकेने पटकावला होता. त्यानंतर हर्षवर्धन सदगीरने एक गुण मिळवत बरोबरी केली होती. त्यानंतर सामन्याला एक मिनिट शिल्लक असताना हर्षवर्धन सदगीर १-२ अशा पिछाडीवर होता. पण अखेरच्या 20 सेकंदात हर्षवर्धनने खेळ पालटविला, हर्षवर्धनने तिहेरी पट काढून 2 गुण घेतले आणि बाजी मारली. हर्षवर्धनने अंतिम लढतीचा सामना ३-२ असा जिंकत जेतेपद पटकावले.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदा अंतिम सामन्यात चांगलीच लढत पाहायला मिळाली. यापूर्वी या दोघांनी एकदाही या स्पर्धेचे जेतेपद पटकावलेले नव्हते. त्यामुळे यावेळी महाराष्ट्र केसरीला नवा विजेता मिळणार हे माहिती होते. पण शैलेश की हर्षवर्धन यांच्यातून नेमका कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली होती.
विशेष म्हणजे दोन्ही महाराष्ट्र केसरी पैलवानांना चीतपट करत लातूरच्या शैलेश शेळके अन् नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे, महाराष्ट्र केसरीची गदा मराठवाड्याला मिळणार की उत्तर महाराष्ट्राला याचीही उत्कंठा दोन्ही विभागातील कुस्ती शौकिनांना लागली होती.
अहमदनगरचा हर्षवर्धन सदगीरमूळचा अहमदनगर जिल्ह्याचा सुपुत्र असणारा हर्षवर्धन सदगीर हा नाशिक जिल्ह्याकडून कित्येक वर्ष महाराष्ट्र केसरीचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान आहे. हर्षवर्धन हा एका शिक्षकाचा मुलगा असून त्याचे आजोबा नामांकित पैलवान होते. पाच वर्षांपासून तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल वस्ताद अर्जुन वीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मल्लविद्येचे धडे गिरवत आहे. यावर्षी शिर्डी येथे झालेल्या 23 वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ग्रीको-रोमन कुस्ती प्रकारात त्याने पदक मिळवले आहे. तसेच वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा हरियाणा येथे सुद्धा त्याने पदकाची कमाई केली आहे. गतवर्षी जालना येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपांत्य फेरीत येऊनसुद्धा पैलवान हर्षवर्धनने स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र, यंदा महाराष्ट्र केसरीची गदा घ्यायचीच, अशा निर्धाराने हर्षवर्धन अंतिम फेरीपर्यंत पोहोचला आहे.