महाराष्ट्र केसरी स्पर्धेस वादाचे गालबोट, दाद मागायची कुणाकडे ?, याआधीच्या काही प्रमुख वादाच्या घटना.. जाणून घ्या
By सचिन यादव | Updated: February 4, 2025 12:18 IST2025-02-04T12:18:10+5:302025-02-04T12:18:38+5:30
महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा अनेकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या

महाराष्ट्र केसरी स्पर्धेस वादाचे गालबोट, दाद मागायची कुणाकडे ?, याआधीच्या काही प्रमुख वादाच्या घटना.. जाणून घ्या
सचिन यादव
कोल्हापूर : राज्यात होत असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेस वादाचे गालबोट लागत आहे. कुस्ती स्पर्धेत सहभागी झालेल्या मल्लांवर कधी पंचांकडून अन्याय केला जातो. तर कधी आक्रमक मल्ल पंचावर हल्ला करतात. तर काही ठिकाणी मनमानी आयोजकांमुळे या स्पर्धेत वादाला तोंड फुटत आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा अनेकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.
अहिल्यानगर येथे झालेल्या ६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबाच्या स्पर्धेत पंचांसोबत हुज्जत घालणे दोन पैलवानांना चांगलेच महागात पडले. पैलवान महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांना महाराष्ट्र कुस्ती परिषदेकडून तीन वर्षांसाठी निलंबित केले. शिवराज राक्षेने पंचांचा निर्णय पटला नाही म्हणून त्यांच्यासोबत हुज्जत घातली होती. पंचांची कॉलर पकडून त्यांना लाथ देखील मारली. हेच कृत्य शिवराज राक्षेला महागात पडले.
कुस्तीच्या आखाड्यात काही मल्लांची खिलाडू वृत्ती कमी होत चालली आहे. पंचांना लाथ मारणे, शिवीगाळ करणे, अंगावर धावून जाण्यासारखे प्रकार यापूर्वी झालेल्या सामन्यात उघड झाले आहेत. अनेकदा संयोजकांवरही मल्ल धावून जातात. तर काही सामन्यात पंचाकडून मल्लांवर अन्याय केला जातो. तर काही सामन्यांवर राजकीय सावट असते. या सर्वांचा परिणाम स्पर्धेच्या निकालावर होतो.
काही प्रमुख वादातीत घटना
- २०१७ : पुणे येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरीत किरण भगतवर पंचांनी अन्याय केल्याची तक्रार
- २०१९ : बालेवाडी येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीत माऊली जमदाडे विरुद्ध पंचांनी अन्याय केल्याची तक्रार
- २०२२ : कोथरूड अधिवेशनात सिकंदर शेखवर सेमी फायनलमध्ये माती गटांत पंचांनी अन्याय केल्याची तक्रार
- २०२५ : अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती किताबाच्या स्पर्धेत पंचांसोबत हुज्जत
दाद मागायची कुणाकडे ?
क्रीडा विभागाने भारतीय कुस्ती महासंघ बरखास्त केला आहे. महाराष्ट्र केसरीसह देशभरात अनेक ठिकाणी कुस्ती स्पर्धा भरविल्या जातात. या स्पर्धेत कोणावर अन्याय झाल्यास दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकदा काही संयोजक कोणतीही मान्यता न घेता परस्पर स्पर्धा भरवितात, अशा संयोजकांवर कारवाई कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सन २००९ मध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना अन्याय झाला होता. ही स्पर्धा खेळताना पंचांच्या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो. तसाच अन्याय ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना शिवराज राक्षेवर देखील झाल्याचा दिसतो. - चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पैलवान राक्षे याने केलेला प्रकार कुस्ती क्षेत्राला भूषणावह नाही. शिवराज राक्षे याच्याकडे माफी मागण्याची संधी होती. मात्र, त्याने माफी मागितली नाही, हे दुर्दैवी आहे. कुस्ती स्पर्धेदरम्यान असे प्रकार घडू नयेत, यासाठी नियमांची कडक पुनर्बांधणी करावी. - दीनानाथ सिंह, हिंदकेसरी
सामन्यात मैदानावरील तिन्ही पंचांनी चितपट कुस्तीचा निकाल दिल्यानंतर आक्रमक झालेल्या शिवराज राक्षेने कुस्ती आखाडा प्रमुखांकडे दाद मागायला हवी होते. चितपट कुस्तीला आव्हान देता येत नाही, सामन्यातील पंचांनी योग्य भूमिका बजावली, खेळाडूंनी पंचांचा सन्मान करायला हवा. - संभाजी पाटील-कोपर्डेकर, पंच, राज्य कुस्तीगीर परिषद