पुणे : पत्रकारितेच्या क्षेत्रातील महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील मानबिंदू ठरण्याच्या मार्गावर असलेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ या उपक्रमाला देशपातळीवर गौरविण्यात आले आहे. ‘मुंबई रोड रनर्स’ (एमआरआर) या संघटनेने देशपातळीवरील मॅरेथॉनपैकी ‘लोकमत पुणे महामॅरेथॉन’ला १० किलोमीटर गटात दुसरा, तर २१ किलोमीटर गटात तिसरा क्रमांक बहाल केला आहे.यंदा जानेवारी तसेच फेब्रुवारी महिन्यांत झालेल्या शर्यतींमधून पुणे महामॅरेथॉनला हा बहुमान मिळाला. १० ते १६ किलोमीटर गटामध्ये ‘लोकमत पुणे महामॅरेथॉन’ने ५.५ रेस रेटिंगसह दुसरा क्रमांक पटकावला. सरासरी ४.४ रेस रेटिंग मिळविणारी ‘लोकमत पुणे महामॅरेथॉन’ शर्यत २१ ते ३२ किलोमीटर गटात तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली.मुंबईतील टाटा मॅरेथॉनने फूल मॅरेथॉन गटात ५.४ रेस रेटिंगसह अव्वल क्रमांक कायम राखण्यात यश मिळविले. १० ते १६ आणि २१ ते ३२ किलामीटर या दोन्ही गटांमध्ये अनुक्रमे ६.३ आणि ५.९ रेस रेटिंगसह मद्रास इनर स्ट्रेंग्थ हाफ मॅरेथॉनने बाजी मारली.१० ते १६ किलोमीटर गटाच्या मॅरेथॉनमध्ये नवी मुंबईतील ‘रन फॉर फ्लेमिंगो’ शर्यतीला तिसरे, तर २१ ते ३२ किलोमीटर गटामध्ये महाराष्ट्र पोलीस इंटरनॅशनल मॅरेथॉन शर्यतीला सहावे स्थान मिळाले आहे.‘पुणे महामॅरेथॉन’ अल्पावधीतचदेशपातळीवर लोकप्रिय का ठरली?क्रीडा नगरी अशी ओळख असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर मॅरेथॉन शर्यतींचे आयोजन केले जाते. या तुलनेत ‘लोकमत पुणे महामॅरेथॉन’चे यंदा केवळ दुसरे वर्ष असून ही या शर्यतीने अल्पावधीतच लोकप्रियतेच्या बाबतीत राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. याला कारणीभूत ठरले ते खेळाडू हा घटक केंद्रस्थानी ठेवून व्यावसायिक पद्धतीने करण्यात आलेले नियोजन. यामुळे २०१९ मध्ये पहिल्याच प्रयत्नात ‘लोकमत पुणे महामॅरेथॉन’ने चोखंदळ पुणेकरांच्या हृदयाचा ठाव घेतला होता.पहिल्या वर्षी मिळालेल्या यशानंतर साहजिकच ‘पुणे महामॅरेथॉन’कडून अपेक्षा वाढल्या होत्या. राष्ट्रीय स्तरावर तिसरा क्रमांक मिळवून या शर्यतीने आपल्याबद्दल असलेल्या अपेक्षांची पूर्तता केली. अर्थात, ‘लोकमत’ पुण्यात पहिल्या क्रमांकाचे दैनिक झाल्यानंतर पुणे,पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील नागरिकांनी महामॅरेथॉनमध्ये हजारोंच्या संख्येने महामॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत या दैनिकावरील आपल्या प्रेमाची पोचपावती दिली.राज्यातील क्रीडा संस्कृती अधिक विकसित व्हावी, या उद्देशाने रुचिरा दर्डा यांच्या संकल्पनेतून ‘लोकमत’ने ‘महामॅरेथॉन’ हा राज्यव्यापी उपक्रम अस्तित्वात आला. आजघडीला नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि पुणे या ५ शहरांत ‘लोकमत महामॅरेथॉन’ आयोजन केले जाते. अशा प्रकारची ‘सर्किट रन’ ही राज्यातीलच नव्हे तर, देशपातळींवरील एकमेव आहे. अशा ‘सर्किट रन’चे आयोजन करणारा ‘लोकमत’ हा देशातील एकमेव माध्यमसमूह ठरला आहे.थँक यू पुणेकर. तुमच्या प्रेमामुळेच ‘लोकमत पुणे महामॅरेथॉन’ला हे भरीव यश मिळू शकले. या यशामुळे पुण्याच्या लौकिकातही भर पडली आहे. येत्या काळातही ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या माध्यमातून पुण्याचा लौकिक आणखी वाढावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.- रुचिरा दर्डा,संस्थापक, लोकमत महामॅरेथॉन
‘लोकमत महामॅरेथॉन’चा देशपातळीवर गौरव, पुणे महामॅरेथॉनला दुसरे स्थान
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 04:21 IST