लियोनेल मेस्सीची निवृत्तीची घोषणा; कतार विश्वचषकात मात्र खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 08:29 AM2022-10-08T08:29:40+5:302022-10-08T08:30:11+5:30

अर्जेंटिना दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याने निवृत्तीची घोषणा केली.

lionel messi announces retirement but qatar will play in the world cup | लियोनेल मेस्सीची निवृत्तीची घोषणा; कतार विश्वचषकात मात्र खेळणार

लियोनेल मेस्सीची निवृत्तीची घोषणा; कतार विश्वचषकात मात्र खेळणार

googlenewsNext

ब्यूनस आयर्स: अर्जेंटिना दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याने शुक्रवारी निवृत्तीची घोषणा केली. कतारमध्ये पुढच्या महिन्यात आयोजित फिफा विश्वचषक आपली अखेरची स्पर्धा असेल, असेही मेस्सीने जाहीर केले.

३५ वर्षांच्या मेस्सीने  देशातील पत्रकार सॅबेस्टियन विग्नोलोला दिलेल्या मुलाखतीत कतारमधील विश्वचषक आटोपताच आपण निवृत्त होऊ असे म्हटले आहे. मेस्सी म्हणाला, ‘मी आधीच हा निर्णय घेतला असून संघाला माहितीदेखील दिली. माझा हा अखेरचा विश्वचषक असेल.’ 

मेस्सीचा हा पाचवा फिफा विश्वचषक राहील. २००५ ला त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. १६४ आंतरराष्ट्रीय सामन्यात ९०, फिफा विश्वचषकाच्या १९ सामन्यात सहा आणि एकूण कारकिर्दीत ७८१ गोल केले आहेत. वयाच्या सहाव्या वर्षापासून मेस्सीचे फुटबॉलमधील पदलालित्य अनेकांच्या नजरेत भरत गेले. वयाच्या दहाव्या वर्षी ‘ग्रोथ हार्मोन डेफिशिएन्शीे’ हा आजार असल्याचे मेस्सीच्या लक्षात आले. यामुळे शरीराचा विकास खुंटतो. उपचारापोटी  महिन्याला एक हजार डॉलरचा खर्च होता. बार्सिलोनाने   त्याच्या उपचाराचा खर्च केला.

टिश्यू पेपरवर पहिला करार !

मेस्सीने पहिला करार टिश्यू पेपरवर केला होता. २००० ला वयाच्या १३ व्या वर्षी तो बार्सिलोना संघात दाखल झाला. पेपर उपलब्ध नसल्याने त्याने चक्क टिश्यूवरच करारावर स्वाक्षरी केली होती. युरोपात स्थायिक व्हावे लागेल या अटीवर त्याला बार्सिलोनाने करारबद्ध केले होते. यामुळे त्याचे कुटुंब युरोपात स्थायिक झाले,  

लियोनेल मेस्सीने कमविलेले सन्मान

बॅलोन डी. ओर : ०७, बेस्ट फिफा प्लेयर : ०१, युरोपियन गोल्डन शूज : ०६, विश्वचषक गोल्डन बॉल : ०१, यूईएफए प्लेयर : ०३, लीगमध्ये प्लेयर ऑफ द इयर : ०६. 

२८ स्पर्धा जिंकल्या पण विश्वचषक नाही

मेस्सीने अर्जेंटिनाला कधीही विश्वचषक जिंकून दिलेला नाही. कोपा अमेरिका, फाईनलिस्मा आणि ऑलिम्पिकचे जेतेपद प्रत्येकी एकदा, लीगचे जेतेपद ११ वेळा, चॅम्पियन्स लीग चार वेळा, क्लब विश्वचषक चार वेळा आणि नेशन्स कप ७ वेळा अशी एकूण २८ विजेतेपदे मेस्सीने जिंकून दिली आहेत. 
 

Web Title: lionel messi announces retirement but qatar will play in the world cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.