विजयाची सुसंधी सोडून आनंद पराभूत

By Admin | Updated: November 16, 2014 01:27 IST2014-11-16T01:27:02+5:302014-11-16T01:27:02+5:30

आनंदने सिसिलीयन बचावातली पॉल्सन पद्धत निवडली आणि त्यात कार्लसनला 5व्या चालीला वजिरा-वजिरी करायचा पर्याय दिला.

Leaving pleasure of victory prevents pleasure | विजयाची सुसंधी सोडून आनंद पराभूत

विजयाची सुसंधी सोडून आनंद पराभूत

जयंत गोखले - 
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतला 6वा डाव आज अनेपक्षित शेवट होऊन संपला. कार्लसनकडे पांढरी मोहरी असल्यामुळे तो विजयासाठी निकराचे प्रयत्न करणार, हे उघड होतं आणि आजच्या डावात त्याने आनंदच्या सिसिलीयन बचावाचे आव्हान स्वीकारून लगेचच डावात रंगत निर्माण केली. आनंदने सिसिलीयन बचावातली पॉल्सन पद्धत निवडली आणि त्यात कार्लसनला 5व्या चालीला वजिरा-वजिरी करायचा पर्याय दिला. कार्लसनने क्षणाचीही उसंत न घेता डाव चटकन अंतिमावस्थेत नेला. कार्लसनचे 2 उंट, डावाच्या केंद्रस्थानी असलेले प्यादे आणि हत्तींना मिळत असलेली मोकळीक यांमुळे केवळ 15व्या चालीनंतरच डावाचे पारडे कार्लसनकडे झुकले होते. 
कार्लसनच्या आवडत्या स्थितीपैकी ही स्थिती होती. त्यामुळे कार्लसनने राजाच्या सुरक्षिततेनंतर लगेचच आक्रमणाला सुरुवात करून आनंदवर कमालीचा दबाव ठेवायला सुरुवात केली. आनंदनेदेखील बचावात कुठलीही कसर ठेवली नव्हती. या वेळचा आनंदचा बचाव हा प्रतिहल्ल्याची तयारी ठेवून केलेला बचाव होता. संचित वेळेच्या संकटात न सापडण्याची खबरदारीदेखील आनंदने घेतल्याचे कळत होते. कार्लसनच्या राजाच्या बाजूने प्रतिहल्ला चढवून आनंदने कार्लसनला रोखले होते. 
19व्या चालीला कार्लसनला धक्का देऊन आनंदने 96 ही प्याद्याची खेळी करत गोंधळवून टाकले होते. त्यातून सावरण्यासाठी कार्लसनने 2 चाली तशाच खेळून आनंदचा अंदाज घेतला. आनंदचा सावधपणा कार्लसनला अस्वस्थ करत होता आणि अगदी अनवधानाने सर्वश्रेष्ठ प्रतिभेचा असामान्य खेळाडू कार्लसन चुकला. 26व्या चालीला कार्लसनने राजाची चाल करून अक्षम्य अशी घोडचूक केली! दुर्दैवाने आनंदने त्याचा फायदा उठवला नाही. आनंदला या चालीत कार्लसनची 2 प्यादी मटकवायची संधी मिळाली होती. ही संधी हातातून निसटल्यावर आणि त्यामुळे सावरलेल्या कार्लसनने पुढे आनंदला अजिबात संधी दिली नाही. 
इथून पुढचा डाव एकतर्फी झाला, असे म्हटले तरी चालेल. कदाचित आनंदलापण लक्षात आले असावे, की त्याने केवढी सोन्यासारखी संधी दवडली. पुढे अवघ्या 7 चालीत, कार्लसननेच आनंदची 2 प्यादी जिंकली. जेव्हा तिसरे प्यादे मरायला लागले, तेव्हा 38व्या चालीला आनंदने शरणागती पत्करली. मिळालेल्या संधीचे रूपांतर आनंदने विजयात केले असते, तर संपूर्ण लढतीचे स्वरूप पालटून गेले असते. काळ्या मोह:यांनी मिळवलेला विजय आनंदचे मनोबल कमालीचे उंचावून गेला असता. कुठल्याही युद्धात ‘जर-तर’ला कवडीमोलाची किंमत असते आणि ‘पुढे काय?’ हा एकच विषय महत्त्वाचा असतो. उद्याच्या विश्रंतीनंतर 7व्या डावात आनंदला पुन्हा एकदा काळी मोहरी घेऊन झुंजायचे आहे. आजची थोडक्यात हुकलेली विजयाची संधी आनंदला हुरूप देते का, ते बघायला हवं. 

 

Web Title: Leaving pleasure of victory prevents pleasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.