रिओ कारकिर्दीतील अखेरचे आॅलिम्पिक
By Admin | Updated: October 27, 2015 23:43 IST2015-10-27T23:43:56+5:302015-10-27T23:43:56+5:30
रिओमध्ये २०१६ मध्ये होणारी आॅलिम्पिक स्पर्धा खेळाडू म्हणून माझ्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असून, या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी

रिओ कारकिर्दीतील अखेरचे आॅलिम्पिक
नवी दिल्ली : रिओमध्ये २०१६ मध्ये होणारी आॅलिम्पिक स्पर्धा खेळाडू म्हणून माझ्या कारकिर्दीतील अखेरची स्पर्धा असून, या स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घालण्यास सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत आॅलिम्पिक पदकविजेता भारतीय मल्ल योगेश्वर दत्त याने व्यक्त केले.
योगेश्वर म्हणाला, ‘रिओ माझ्यासाठी खेळाडू म्हणून अखेरची आॅलिम्पिक स्पर्धा ठरणार आहे. कारकिर्दीचा शेवट पदकासह करण्यास उत्सुक आहे. मी तयारी करीत असून सुवर्णपदक पटकावण्याचे लक्ष्य आहे. आॅलिम्पिकनंतर निवृत्ती स्वीकारणार नसून आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होणार आहे.’
लंडन आॅलिम्पिक २०१२ मध्ये कांस्यपदकाचा मानकरी ठरलेला योगेश्वर दोन महिन्यांच्या सरावासाठी अमेरिका किंवा रशियात जाणार आहे. तेथे तो आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेची तयारी करणार आहे.’
दुखापतग्रस्त असल्यामुळे अमेरिकेतील लास वेगासमध्ये झालेल्या विश्व कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सहभागी होता आले नाही, असेही योगेश्वरने या वेळी स्पष्ट केले. व्यावसायिक कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये दुखापतग्रस्त झाला तर काय होईल, याबाबत बोलताना योगेश्वर म्हणाला, ‘हे मोठे व्यासपीठ सोडण्याचा धोका पत्करू शकत नाही. या स्पर्धेत जगातील दिग्गज मल्ल सहभागी होत असून, त्यानिमित्ताने स्वत:ची क्षमता तपासण्याची संधी मिळणार आहे.’ (वृत्तसंस्था)