साश्रुनयनांनी क्रिकेटपटू फिल ह्युजला अखेरचा निरोप
By Admin | Updated: December 3, 2014 13:32 IST2014-12-03T12:18:46+5:302014-12-03T13:32:39+5:30
कुटुंबिय, मित्र, सहकारी आणि हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलीप ह्युजला आज साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला.
साश्रुनयनांनी क्रिकेटपटू फिल ह्युजला अखेरचा निरोप
>ऑनलाइन लोकमत
मॅक्सव्हिले (ऑस्ट्रेलिया), दि. ३ - कुटुंबिय, मित्र, सहकारी आणि हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलीप ह्युजला आज साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. एका स्थानिक सामन्यादरम्यान खेळताना बाऊंसर लागून डोक्याला दुखापत झाल्याने फिल ह्युजचा गेल्या गुरूवारी मृत्यू झाला होता. आज अखेर मॅक्सव्हिले या त्याच्या जन्मगावी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट, ऑस्ट्रेलियान संघातील खेळाडूंसह जगातील अनेक आजी- माजी दिग्गज खेळाडू व पाच हजारांहून अधिक नागरिक उपस्थित होते.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने त्याचा जीवलग मित्र व लहान भावासारख्या असणा-या फिलच्या कॉफीनला खांदा दिला. ' मला तुमच्याबद्दल माहीत नाही, पण मी त्याला शोधत असतो. मला माहीत आहे, की हे ऐकायला थोडं विचित्र वाटेल पण मला वाटतं की आत्ता त्याचा फोन येईल किंवा एखाद्या कोप-यात त्याचा चेहरा दिसेल. तो सदैव माझ्यासोबत राहिल अशी मी आशा करतो. फिल लोकांना नेहमी जोडून ठेवायचा. खेळाप्रती त्याला असलेलं प्रेम तो नेहमी साजरं करत असे. त्याच्या या गुणांमुळे जगभरातील अनेक क्रिकेटपटूंनी आपली बॅट ठेवून त्याला श्रद्धांजली वाहिली. जे लोक त्याला ओळखतही नव्हते त्यांनी त्याच्यासाठी फुलं ठेवली. ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो,' अशा शब्दांत क्लार्कने फिलला श्रद्धांजली वाहिली. आपल्या मित्राला अखेरचा निरोप देताना क्लार्कला अश्रू अनावर झाले होते. '
फिलच्या अंत्यसंस्काराप्रसंगी भारतातर्फे खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा, प्रशिक्षक डंकन फ्लेचर व रवी शास्त्री उपस्थित होते.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून फिल ह्युजला श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'फिल ह्युज आम्ही कधीच तुला विसरू शकणार नाही. तुझा खेळ आणि जोशामुळे तू जगभरात तुझे चाहते निर्माण केले आहेस,' अशा शब्दांत त्यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्क्त केल्या आहेत.