कोटलावर सेहवागचा नेहमीच फ्लॉप शो
By Admin | Updated: October 27, 2015 23:42 IST2015-10-27T23:42:01+5:302015-10-27T23:42:01+5:30
भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. जुन्या दिल्लीतील नजफगडच्या या खेळाडूने फिरोजशाह कोटला

कोटलावर सेहवागचा नेहमीच फ्लॉप शो
नवी दिल्ली : भारताचा स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. जुन्या दिल्लीतील नजफगडच्या या खेळाडूने फिरोजशाह कोटला मैदानावर क्रिकेटचे ‘ग म भ न’ गिरवले; पण जगातील अनेक मैदाने गाजविणाऱ्या सेहवागला फिरोजशाह कोटला मैदान मात्र अनलकी ठरले आहे. या मैदानावर त्याचा नेहमीच फ्लॉप शो झाला आहे.
जगातील कोणत्याही मैदानावर कोणत्याही गोलंदाजावर तुटून पडणारी सेहवागची बॅट होम ग्राउंड कोटलावर मात्र ‘खामोश’ असायची, असे आकडे बोलतात. केवळ आंतरराष्ट्रीय नाही, तर प्रथम श्रेणी सामने, इतकेच काय तर आयपीएलमध्येही तो फ्लॉप गेला आहे. कोटला मैदानावर सेहवाग कधीच शतक करू शकलेला नाही. त्याने या मैदानावर ९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. यात त्याने ३२च्या सरासरीने ३२१ धावा केल्या. यात त्याची ७४ ही सर्वोत्तम धावसंख्या आहे. या सामन्यात ३ कसोट्यांतील ५ डावांचा समावेश आहे. ज्यामध्ये त्याने ४०च्या सरासरीने ३ अर्धशतकांच्या मदतीने २०१ धावा केल्या. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सेहवाग कधीच पन्नाशी गाठू शकला नाही. येथे झालेल्या ६ सामन्यांत त्याने १२० धावा केल्या आहेत. वनडेत त्याने ४२ धावांची सर्वोच्च खेळी २००२मध्ये इंग्लंडविरुद्ध केली होती. चौकार-षटकारांची आतषबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सेहवागला कोटलाची सीमारेषा ‘हवाई मार्गे’ पार करण्यात फक्त ४ वेळा यश आले आहे. त्याने आपल्या होमग्राउंडवर एकही आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० सामना खेळलेला नाही. प्रथम श्रेणी सामन्यातही याहून वेगळी परिस्थिती नाही. दिल्लीकडून असो वा इतर कोणत्याही संघाकडून, सेहवाग येथे आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी कधीच करू शकलेला नाही.