बांगलादेशविरुद्ध कोहलीची कसोटी
By Admin | Updated: June 10, 2015 01:34 IST2015-06-10T01:34:36+5:302015-06-10T01:34:36+5:30
बांगलादेशाविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघासाठी परीक्षा होणार आहे.
बांगलादेशविरुद्ध कोहलीची कसोटी
फतुल्लाह : बांगलादेशाविरुद्ध बुधवारपासून प्रारंभ होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघासाठी परीक्षा होणार आहे.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान महेंद्रसिंह धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर कोहलीची कसोटी कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. बांगलादेशाविरुद्ध कसोटी सामन्यात धोनीविना नव्या युगाची सुरुवात होणार आहे. भारतीय कसोटी संघातील खेळाडूंच्या वयाची सरासरी २६ आहे. कोहली व बांगलादेशाचा कर्णधार मुशफिकर रहीम बुधवारी साहेब उस्मन अली स्टेडियमच्या मैदानावर उतरतील, त्या वेळी जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळेल. भारताच्या सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीने १५ वर्षांपूर्वी बांगलादेशविरुद्ध एका कसोटी सामन्याद्वारे पूर्णकालिक कर्णधार म्हणून सुरुवात केली होती. ती लढत ढाका येथील वंंगबंधू स्टेडियममध्ये खेळली गेली. फरक केवळ हा आहे, की कोहलीसाठी कर्णधार म्हणून ही तिसरी लढत आहे, तर गांगुलीने त्या लढतीद्वारे कर्र्णधारपदाची सुरुवात केली होती. कोहली आपल्या चमकदार कारकिर्दीत नव्या अध्यायाची सुरुवात करेल. या लढतीच्या निमित्ताने कोहलीच्या नेतृत्वाची परीक्षा ठरणार आहे. भारतीय संघ या कसोटीत ६ फलंदाज व ४ गोलंदाज आणि एका स्पेशालिस्ट विकेटकीपरसह उतरणार की अतिरिक्त गोलंदाजाला संधी देणार, याबाबत उत्सुकता आहे.
कागदावर बघता, या लढतीत भारताचे पारडे वरचढ भासत आहे. भारताने बांगलादेशाविरुद्ध सातपैकी सहा कसोटी सामन्यांत विजय मिळविला आहे.
बांगलादेशाच्या खेळाडूंची अलीकडच्या कालावधीतील कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. विश्वकप स्पर्धेत इंग्लंडचा पराभव करून बांगलादेश संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला होता. त्यानंतर बांगलादेशाने पाकिस्तानविरुद्ध वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-०ने विजय मिळविला व एक कसोटी सामना अनिर्णीत राखला. त्यामुळे बांगलादेशाला कमी लेखण्याची चूक करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघाला धोक्याचा इशारा मिळाला आहे.
विश्वकप स्पर्धेत भारताविरुद्धच्या लढतीत बागंलादेशाचे चाहते ‘नो बॉल’चा वाद विसरलेले नाही. यामुळे आम्हाला आगेकूच करता आली नाही, असे चाहत्यांचे मत आहे. त्यामुळे बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या लढतीबाबत अधिक उत्सुकता आहे.
वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनच्या नेतृत्वाखाली बांगलादेशाच्या गोलंदाजांसाठी आव्हान सोपे नाही. त्यांना जगातील सर्वोत्तम फलंदाजी क्रम असलेल्या संघाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. कोहलीने आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत चार शतकांसह ६९२ धावा फटकावल्या होत्या. के. एल. राहुल खेळणार नसल्यामुळे शिखर धवनला लाभ मिळणार आहे. धवन अंतिम संघातील स्थान निश्चित करण्यास उत्सुक आहे. कामगिरीत सातत्य राखण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याला सिडनी कसोटी सामन्यातून वगळण्यात आले होते. विश्वकप व आयपीएलमध्ये मात्र त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली. धवनला संघातील स्थान निश्चित करण्याची संधी मिळाली आहे. प्रतिस्पर्धी संघात अँडरसन किंवा ब्रॉड यांच्यासारखे स्विंग गोलंदाज किंवा जॉन्सन किंवा स्टार्क यांच्यासारखे वेगवान गोलंदाज नाहीत. त्यामुळे धवनला सूर गवसणे सोपे राहील. इंग्लंड व आॅस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या मोसमात चमकदार कामगिरी करणारा मुरली विजय कामगिरीत सातत्य राखण्यास उत्सुक आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षभरात कामगिरीत सातत्य राखणारा अजिंक्य रहाणे कसोटी सरासरी सुधारण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताने ६ फलंदाजांना संधी दिली, तर चेतेश्वर पुजारा व रोहित शर्मा या दोघांना संधी मिळेल. यष्टिरक्षक रिद्धिमान साहला संघातील स्थान पक्के करण्याची संधी आहे. गेल्या पाच वर्षांत धोनी संघात असल्यामुळे अन्य खेळाडूंना संधी मिळालेली नाही. गोलंदाजीमध्ये दोन वर्षांनंतर पुनरागमन करणाऱ्या हरभजनसिंगच्या कामगिरीवर लक्ष राहील. आर. आश्विनच्या साथीने तो फिरकीची छाप पाडण्यास उत्सुक आहे. वेगवान गोलंदाजीची भिस्त ईशांत शर्माच्या कामगिरीवर अवलंबून राहील. त्याच्या साथीला भुवनेश्वर कुमार, उमेश यादव व वरुण अॅरोन हे आहेत. (वृत्तसंस्था)
...याचा कधी विचार केला नव्हता : कोहली
कोहली म्हणाला,‘माझ्यासाठी ही विशेष बाब आहे. वयाच्या २६ व्या वर्षी भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व भूषवण्याची संधी मिळेल, याचा कधी विचार केला नव्हता. भारतीय कसोटी संघाचे प्रतिनिधित्व करणे माझे एकमेव स्वप्न होते. अनुभवाने परिपक्वता आली. बीसीसीआय व माझ्या सहकाऱ्यांनी मला कर्णधारपदासाठी लायक ठरविले. त्यांचा मी आभारी आहे. मी माझ्या पद्धतीने संघातील खेळाडूंसोबत चर्चा केली. आम्ही सर्व एकाच पद्धतीने विचार करतो. पूर्णकालिक कसोटी कर्णधार म्हणून सकारात्मक सुरुवात करण्यास उत्सुक आहे.’
> सामन्याबाबत बोलताना कोहली म्हणाला, ‘पाच गोलंदाज व सहा फलंदाजांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. मी गोलंदाजांना २० बळी घेण्याची संधी देण्याबाबत विचार करीत आहे. त्यामुळे सहा फलंदाज व पाच गोलंदाजांसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे. संघाला पाचशे धावांचा पल्ला दोन किंवा तीन फलंदाज मोठी खेळी करून गाठून देऊ शकतात.’
> संघाला सरावासाठी पुरेसा वेळ मिळाला का? याबाबत बोलताना कोहली म्हणाला,‘ केवळ एक कसोटी सामना खेळायचा असल्यामुळे अतिरिक्त मेहनत घेता येते. जर तीन-चार कसोटी सामन्यांची मालिका असती, तर ऊर्जा राखून ठेवावी लागली असती. सज्ज होण्यासाठी मेहनत घेत आहोत. सरावामुळे लय गवसते. खेळपट्टीबाबत अधिक विचार करण्याची गरज नाही. बांगलादेशमध्ये खेळपट्ट्या एकसारख्या असतात. अनेक खेळाडूंना गेल्या वर्षी येथे खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे खेळपट्टी कशी आहे, याची कल्पना आहे.’
उभय संघांना समान संधी : रहीम
फतुल्लाह : बांगलादेशचा कर्णधार मुशफिकर रहीमने अलीकडच्या कालावधीतील कामगिरीचा विचार करता भारताविरुद्ध बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात संघाकडून चमकदार कामगिरीची आशा व्यक्त केली आहे. आतापर्यंत उभय संघांदरम्यान सात सामने खेळले गेले असून, त्यापैकी सहा सामन्यांत बांगलादेशला पराभव स्वीकारावा लागला आहे. तरी रहीमने बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या लढतीत उभय संघांना समान संधी असल्याचे म्हटले आहे.
रहीम म्हणाला, ‘‘भारतीय संघात दिग्गज खेळाडूंचा समावेश असला तरी उभय संघांना समान संधी आहे. भारतीय संघात दोन प्रतिभावन फिरकीपटूंचा समावेश आहे. आमच्या फलंदाजांनी त्यांना समर्थपणे तोंड दिले तर सामना रंगतदार होईल.’’
रहीमच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघाने पाकिस्तानचा वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-० ने पराभव केला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बांगलादेश संघ भारताविरुद्ध खेळत आहे. यंदा विश्वकप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणाऱ्या बांगलादेश संघाने कसोटी दर्जा मिळविल्यानंतर ९० पैकी ७१ सामने गमावले आहेत.
अशी खेळपट्टी बघितली नाही : बांगलादेश प्रशिक्षक
भारताविरुद्ध बुधवारपासून खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यासाठी असलेल्या खेळपट्टीमुळे यजमान बांगलादेश संघ आश्चर्यचकित झाला आहे. यापूर्वी अशी खेळपट्टी कधी बघितली नाही, अशी प्रतिक्रिया बांगलादेश संघाचे श्रीलंकन प्रशिक्षक चंडिका हथुरुसिंघा यांनी व्यक्त केली.
हथुरुसिंघा म्हणाले, ‘‘या खेळपट्टीबाबत अंदाज व्यक्त करणे कठीण आहे. कारण अशी खेळपट्टी कधी बघितली नाही. आम्हाला उष्णतेवरही लक्ष द्यावे लागणार आहे. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल राहील.
विक्रमापेक्षा कामगिरीवर लक्ष : मोमीनुल
फतुल्लाह : भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात माझे लक्ष विक्रमापेक्षा चमकदार कामगिरी करण्यावर केंद्रित झाले असल्याचे बांगलादेशाचा स्टार कसोटी फलंदाज मोमीनुल हकने म्हटले आहे. मोमीनुलला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एबी डिव्हिलियर्सच्या सलग १२ अर्धशतके नोंदविण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. सध्या या विक्रमाबाबत विचार करीत नसल्याचे मोमीनुल म्हणाला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डिव्हिलियर्सने २०१२ ते २०१४ या कालावधीत कसोटी सामन्यांत सलग १२ अर्धशतके झळकावण्याचा विक्रम नोंदवला आहे, तर मोमीनुलने २०१३ पासून आजतागायत ११ अर्धशतके फटकावली आहेत.
-------------
भारत :- विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, रिद्धिमान साहा, हरभजनसिंग, आर. आश्विन, वरुण अॅरोन, उमेश यादव, ईशांत शर्मा, कर्ण शर्मा, भुवनेश्वर कुमार.
बांगलादेश :- मुशफिकर रहीम (कर्णधार), तमीम इक्बाल, अबुल हसन, इमरुल कायेस, जुबेर हुसेन, लिट्टन दास, मोहंमद शाहीद, मोमीनुल हक, नासीर हुसेन, रुबेल हुसेन, शाकीब अल हसन, स्वागत होम, सौम्य सरकार, तैजुल इस्लाम, महमूदुल्लाह.
--------------
> २०००-०१ मध्ये भारताने बांगलादेशाविरुद एक कसोटी खेळी होती. तीत भारताने विजय नोंदविला होता. २००४-०५मध्ये दोन कसोटींची मालिका भारताने २-०ने जिंकली होती. २००७मध्ये चितगाव येथे पहिली कसोटी अनिर्णीत राहिली होती. ढाका येथे दुसऱ्या कसोटीत भारताने एक डाव २३९ धावांनी विजय मिळविला होता.
> २००९-१० मध्ये भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये दोन कसोटी सामने झाले होते. दोन्ही सामने भारताने जिंकले होते.
> दुस-या कसोटीत पहिल्या डावात ईशांत शर्माने ४ व झहीर खानने ३ बळी घेतले होते. राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरने अनुक्रमे १११ व १४३ धावा केल्या होत्या. बांगलादेशाकडून दुसऱ्या डावात तमीम इक्बालने १५१ धावांची दमदार खेळी केली होती. झहीर खानने दुसऱ्या डावात ७ विकेट घेतल्या होत्या. भारताने हा सामना १० विकेटनी जिंकला होता.
> पहिल्या कसोटीत वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखाली सचिन तेंडुलकरने पहिल्या डावात नाबाद १०५ धावांची खेळी केली होती. बांगलादेशाकडून शफिउल इस्लाम व शाकीब उल हसनने प्रत्येकी पाच बळी घेतले होते. दुसऱ्या डावात गौतम गंभीरने ११६ धावा केल्या होत्या. बांगलादेशाकडून भारताकडून झहीर खानने दोन्ही डावांत मिळून एकूण ५ आणि अमित मिश्राने ७ बळी घेतले होते. बांगलादेशाकडून दुसऱ्या डावात शाकीब उल हसनने १०१ धावा केल्या होत्या. भारताने ही कसोटी ११३ धावांनी जिंकली होती.
> २०००-१0 दरम्यान बांगलादेशाविरुद्ध सचिन तेंडुलकरने ७ कसोटी सामन्यांमध्ये ९ डावांत सर्वाधिक ८२० धावा केल्या आहेत. यामध्ये तो तीन वेळा नाबादा राहिला असून, त्याची सर्वोच्च खेळी नाबाद २४८ धावांची आहे. ही खेळी त्याने ढाका येथे १० डिसेंबरला सुरू झालेल्या कसोटीत केली आहे.
> २०००-१0 दरम्यान बांगलादेशाविरुद्ध सर्वाधिक ३१ विकेट घेण्याची कामगिरी झहीर खानने केली आहे. त्याने ही कामगिरी १४ डावांत केली आहे. त्याची सर्वोत्कृष्ट कामगिरी ८७ धावांत ७ बळी आहे.