कोहलीने योग्यच केले : अझहर
By Admin | Updated: December 14, 2014 23:55 IST2014-12-14T23:55:42+5:302014-12-14T23:55:42+5:30
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनने विराट कोहलीच्या कृतीचे समर्थन केले. विराटने आॅस्ट्रेलियाच्या धावांचा पाठलाग करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता, असे अझहरुद्दिनने म्हटले आहे.

कोहलीने योग्यच केले : अझहर
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनने विराट कोहलीच्या कृतीचे समर्थन केले. विराटने आॅस्ट्रेलियाच्या धावांचा पाठलाग करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता, असे अझहरुद्दिनने म्हटले आहे.
कोहलीने पाचव्या दिवशी आॅस्ट्रेलियाच्या ३६४ धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र संघाला ४८ धावांंनी पराभूत व्हावे लागले होते. भारताने शेवटचे आठ बळी फक्त ७३ धावांत गमावले. भारतीय फलंदाजांच्या कामगिरीने अझहरुद्दिनला निराशा झाली नाही. यामुळे आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या उणिवा दिसल्या. तो म्हणाला, ‘मला वाटते विराटने धावांचा पाठलाग करून खूप चांगली गोष्ट केली. आपण चांगले खेळत होतो. मात्र ऐन मोक्याच्या वेळी विकेट पडल्यामुळे पराभव झाला. मात्र यामुळे आॅस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या आक्रमणातील उणिवा दिसल्या.’
या कार्यक्रमात पाकिस्तानचा माजी कर्णधार वासिम अक्रम, जलदगती गोलंदाज शोएब अख्तर, भारताचे गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवाग यांनीही सहभाग घेतला होता. शोएब अख्तरनेही विराट कोहलीची स्तुती केली. तो म्हणाला, ‘या सामन्यात तो ज्या पद्धतीने खेळला त्याद्वारे त्याने तो फक्त महान वन-डे खेळाडू नसून तो जबरदस्त कसोटी खेळाडू असल्याचेही सिद्ध केले आहे.’
विश्वचषकाच्या संभाव्य विजेत्याबद्दल विचारले असता अख्तर म्हणाला, ‘भारताकडे सध्या ताशी १४० कि.मी. वेगाने चेंडू टाकू शकणारे तीन गोलंदाज आहेत, ही चांगली गोष्ट आहे, मात्र त्यांनी फिट राहणे गरजेचे आहे. पाकिस्तान आणि भारताने योग्य पद्धतीने खेळ केला, तर या दोन संघांपैकीच एक विजेता असेल.’
विश्वचषकाच्या प्रबळ दावेदारांबाबत विचारले असता गौतम गंभीर म्हणाला, ‘कोणत्याही एका संघाची निवड करणे अशक्य आहे. मला मनापासून वाटते की भारत विश्वचषक जिंकेल. मात्र, आॅस्ट्रेलिया विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे, कारण त्यांच्या भूमीत ही स्पर्धा होत आहे.’
सेहवागने दक्षिण आफ्रिका आणि आॅस्ट्रेलिया हे प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले. अक्रमने दक्षिण आफ्रिका हा सर्वांत धोकादायक संघ असल्याचे सांगितले.