Khelo India University competition will be important for the youth | खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा युवांसाठी महत्त्वाची ठरेल

खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा युवांसाठी महत्त्वाची ठरेल

पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेला शुक्रवारपासून ओडिशामध्ये प्रारंभ होत आहे. विद्यापीठ पातळीवरील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने क्रीडा मंत्रालयाचे हे पाऊल प्रशंसनीय आहे. खेलो इंडियाने प्राथमिक स्तरावर क्रीडा गुणवत्ता शोधण्यासाठी व त्याला पैलू पाडण्यासाठी शानदार कार्य केले आहे. आता या स्पर्धेला विद्यापीठ पातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यात २५ वर्षांखालील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळेल. ही स्पर्धा यासाठीही महत्त्वाची आहे की, पदकविजेत्याला भविष्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तयार करता येईल. एवढेच नाहीतर आॅलिम्पिकसाठी सुद्धा.

जगभरातील मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी गुणवत्ता शोधण्याचे कार्य विद्यापीठांमध्ये केले जाते. उदाहरण द्यायचे झाल्यास अमेरिका येथे यूएस नॅशनल कोलेजियट अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन चॅम्पियनशिपला फार महत्त्व आहे. २०१८-१९ मध्ये एकट्या डिव्हिजन वनमध्ये १.८२ लाख खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता, तर असे तीन डिव्हिजन आहेत. यातील विजेते खेळाडू सर्व मोठ्या स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करतात. दुर्दैवाने भारतात आम्ही प्रदीर्घ कालावधीपासून खेळ व शिक्षण यांना दोन वेगळ्या तराजूमध्ये तोलत असतो. महत्त्वाचे म्हणजे, आपण शिक्षण संस्थांकडे केवळ अकादमी सेंटर म्हणून बघायला नको, तर सेंटर आॅफ एक्सलन्स म्हणून बघायला हवे. येथे खेळासह विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीच्या प्रत्येक गोष्टीला प्रोत्साहन द्यायला हवे.
मुलांवर मोठे दडपण असते. आधी १० वी आणि नंतर १२ वी चा विचार करावा लागतो. त्यानंतर प्रत्येक प्रकारच्या प्रवेश परीक्षांचा विचार येतो. विद्यापीठात मात्र सहज वातावरण असते. सुविधा असतात, जागा उपलब्ध असते. यामुळे खेळात कारकिर्द करण्यासाठी गुणवान खेळाडूंना पाठिंबा मिळू शकतो. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेच्या माध्यमातून विद्यापीठ प्रोत्साहन देईल, शिवाय विद्यार्थीही खेळाकडे गंभीरपणे पहायला शिकतील. मुलांसाठी ही मोठी संधी आहे. खेळात आंतरराष्टÑीय स्तरावर भरारी घेण्यासाठी विद्यापीठ स्तरावरील स्पर्धा ‘मैलाचा दगड’ सिद्ध होऊ शकतील.
भारतासारख्या विशाल देशात गुणवत्तेची उणीव नाही. त्या तुलनेत खेळाच्या पायाभूत सुविधांचा अभाव आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे आता अनेक खेळांकडे कारकिर्दीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. तरीही अनेक संधींची गरज आहे. खेळात युवा भारतीयांच्या पंखांना बळ देण्याच्या हेतूने खेलो इंडिया विद्यापीठ गेम्स हे शानदार व्यासपीठ आहे. विशेषत: भारतीय बॅडमिंटनने गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय वर्चस्वाची नवी गाथा लिहिल्याचे सर्वांनी अनुभवले आहेच.
 

Web Title:  Khelo India University competition will be important for the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.