खेलो इंडिया: पूजा दानोळेचा सुवर्ण चौकार; सायकलिंगमध्ये दबदबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 06:55 IST2020-01-16T03:59:34+5:302020-01-16T06:55:19+5:30
बुधवारी पूजाने वैयक्तिक चौथे पदक जिंकत २०० मी. पर्स्यूट शर्यतीत २ मिनीट ४७.४१५ सेकंद अशी वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले.

खेलो इंडिया: पूजा दानोळेचा सुवर्ण चौकार; सायकलिंगमध्ये दबदबा
गुवाहाटी : कोल्हापूरच्या पूजा दानोळेने खेलो इंडिया यूथ गेम्स स्पर्धेत आपली सुवर्ण घोडदौड कायम राखताना सायकलिंगमध्ये तब्बल चौथे सुवर्ण पदक पटकावले. वैयक्तिक पर्स्यूट स्पर्धा जिंकताना तिने महाराष्ट्राच्या खात्यात आणखी एक सुवर्ण नोंदवले. स्प्रिंटमध्ये साताऱ्याच्या मयूर पवारने दुसरे सुवर्ण, तर मयुरी लुटे हिने रौप्य पदक पटकावले.
बुधवारी पूजाने वैयक्तिक चौथे पदक जिंकत २०० मी. पर्स्यूट शर्यतीत २ मिनीट ४७.४१५ सेकंद अशी वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले. तिने ४३.०१ प्रतीतास अशा वेगाने बाजी मारली. पूजाने आतापर्यंत चार सुवर्ण व एक कांस्य अशी कमाई केली आहे. पूजाच्या वेगापुढे मणिपूरच्या बिसेशोरी चानू व कर्नाटकच्या अंकिता राठोड यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या २१ वर्षांखालील स्प्रिंटमध्ये आशियाई विजेत्या मयूरने २०० मीटर शर्यतीत ११.३०६ सेकंदाची वेळ दिली. अंदमानचा पॉल कॉलिंगवूड व पंजाबचा ए. अभिंदू यांनी रौप्य व कांस्य पदक जिंकले.
खो-खोमध्ये बलाढ्य महाराष्ट्राने विजयी सुरुवात करत २१ वर्षांखालील मुलांमध्ये तामिळनाडूचा १६-९ असा एक डाव व ९ गुणांनी धुव्वा उडवला. १७ वर्षांखालील मुलांमध्ये महाराष्ट्राने धमाकेदार खेळ करताना आंध्र प्रदेशचा १६-५ असा फडशा पाडला. (वृत्तसंस्था)