खेलो इंडिया पॅरा स्पर्धा: महाराष्ट्रासाठी 'गोल्डन संडे'; तिरंदाजीत आदिल, नेमबाजीत सागरला सुवर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 13:16 IST2025-03-24T13:16:00+5:302025-03-24T13:16:18+5:30

दिलीप गावितची ४०० मीटरमध्ये सुवर्ण कामगिरी

Khelo India Para Games Maharashtra's 'Golden Sunday'; Adil, Sagar win gold | खेलो इंडिया पॅरा स्पर्धा: महाराष्ट्रासाठी 'गोल्डन संडे'; तिरंदाजीत आदिल, नेमबाजीत सागरला सुवर्ण

खेलो इंडिया पॅरा स्पर्धा: महाराष्ट्रासाठी 'गोल्डन संडे'; तिरंदाजीत आदिल, नेमबाजीत सागरला सुवर्ण

नवी दिल्ली: खेलो इंडिया पॅरा गेम्समध्ये सलग तिसरा दिवस महाराष्ट्रासाठी सुवर्णमय ठरला. तिरंदाजीत आदिल अन्सारी, नेमबाजीत सागर कातळेने अव्वल कामगिरी केली. नाशिकच्या दिलीप गावित याने पुरुषांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत टी-४७ या प्रकारातून सुवर्णपदक पटकावले. कोल्हापूरचा साईवर्धन पाटील, कऱ्हाडचा साहिल सय्यद, चैतन्य पाठक हे रुपेरी यशाचे मानकरी ठरले. तिरंदाजीत राजश्री राठोडने, पॉवर लिफ्टिंगमध्ये शुक्ला बीडकर, सोनम पाटीलने रौप्यपदके जिंकून दिवस गाजविला.

जवाहरलाल नेहरू स्टेडियम परिसरात सुरू असलेल्या आर्चरी स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या आदिल अन्सारीने सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या डब्ल्यू १ प्रकारात सलग दुसऱ्या स्पर्धेत आदिलने सोनेरी वेध घेतला. अंतिम फेरीत हरयाणाच्या नवीन दलालविरुद्ध आदिलची सुरुवात खराब झाली होती. पहिल्या दोन फेऱ्यांत पिछाडीवर असताना अंतिम फेरीत अचूक नेमबाजी करीत आदिलने सुवर्णपदक खेचून आणले. १२३ गुणांसह अवघ्या दोन गुणांनी आदिलने अव्वल कामगिरी केली. हरयाणाच्या दलाल यांना १२१ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

महिलांच्या रिकर्व्ह प्रकारात यवतमाळच्या राजश्री राठोडला सुवर्णयशाने हुलकावणी दिली. राजश्रीला आंतरराष्ट्रीय खेळाडू पूजाने ६-४ फरकाने नमवले. ३ वर्षांची असताना राजश्रीचा उजवा पाय गुडघ्यापासून अंधू झाला होता. अकरावीत शिकत असलेली राजश्री ही शेतमजुराची मुलगी असून तिला प्रशिक्षक सुरेंद्र राठोड यांचे मार्गदर्शन मिळत आहे.

डॉ. कर्णीसिंग शूटिंग रेंजवर लातूरच्या सागर कातळेने मिश्र १० मीटर एअर रायफल प्रोन एसएच १ प्रकारात सुवर्णपदकाचा वेध घेतला. २५१.३ गुणांची कमाई करीत प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेच्या सुवर्णयशावर सागरने नाव कोरले. लातूरमधील शेतकऱ्याचा मुलगा असणारा सागर जन्मापासून दोन्ही पायांनी अधू आहे.

पॉवर लिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४१ किलो गटात महाराष्ट्राच्या शुक्ला बीडकर, सोनम पाटीलने रुपेरी यशाचे वजन पेलले. कोल्हापूरच्या ३५ वर्षीय शुक्ला बीडकरने ५० किलो वजन उचलून सलग दुसऱ्या स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. महिलांच्या ४५ किलो गटात कोल्हापूरच्या सोनम पाटीलने ५९ किलो वजन उचलण्याची कामगिरी करीत रौप्यपदकाची कमाई केली.

 

Web Title: Khelo India Para Games Maharashtra's 'Golden Sunday'; Adil, Sagar win gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.