कश्यपचा ‘गोल्डन’ स्मॅश

By Admin | Updated: August 4, 2014 03:01 IST2014-08-04T03:01:28+5:302014-08-04T03:01:28+5:30

भारताच्या पारूपल्ली कश्यपने ऐतिहासिक कामगिरी करताना आज, रविवारी खेळल्या गेलेल्या रंगतदार अंतिम लढतीत सिंगापूरच्या डेरेक वोंगची झुंज २१-१४, ११-२१, २१-१९ ने मोडून काढली

Kashyap's 'Golden Smash' | कश्यपचा ‘गोल्डन’ स्मॅश

कश्यपचा ‘गोल्डन’ स्मॅश

ग्लास्गो : भारताच्या पारूपल्ली कश्यपने ऐतिहासिक कामगिरी करताना आज, रविवारी खेळल्या गेलेल्या रंगतदार अंतिम लढतीत सिंगापूरच्या डेरेक वोंगची झुंज २१-१४, ११-२१, २१-१९ ने मोडून काढली आणि ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये पुरुष एकेरीचे सुवर्णपदक पटकाविले. भारताचे या स्पर्धेत बॅडमिंटनमधील पहिले सुवर्णपदक आहे. दरम्यान, महिला दुहेरीमध्ये ज्वाला गुट्टा व अश्विन पोनप्पा या भारतीय जोडीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
पहिला गेम सहज जिंकणाऱ्या कश्यपने दुसरा गेम गमावला. निर्णायक गेममध्ये कश्यपने चमकदार कामगिरी करीत ऐतिहासिक विजय मिळविला. भारताला चार वर्षांपूर्वी दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत सायना नेहवालने महिला एकेरीत सुवर्णपदकाचा मान मिळवून दिला होता. यावेळी कश्यपने पुरुष एकेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली. याआधी, या स्पर्धेत महिला एकेरीत पी.व्ही. सिंधूने तर पुरुष एकेरीत आर.एम.व्ही. गुरुसाईदत्त यांनी कांस्यपदक पटकाविण्याची कामगिरी केली आहे. अंतिम लढतीत निर्णायक गेममध्ये एकवेळ उभय खेळाडू १९-१९ ने बरोबरीत होते. वोंगने परतीचा फटका कोर्टच्या बाहेर मारल्यामुळे कश्यपला २०-१९ ची आघाडी मिळाली. त्यानंतर कश्यपने जोरकस फटक्यावर गुण वसूल करील विजयावर शिक्कामोर्तब केले. विजेतेपदाचा आनंद साजरा करताना कश्यपने आनंदाने टीशर्ट काढून हवेत उंचावला. भारतीय तंबूत आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र होते. राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी कश्यपला आलिंगन दिले. सामन्यादरम्यान उत्साह वाढविणाऱ्या प्रेक्षकाला कश्यपने सामन्यानंतर आपली रॅकेट भेट दिली. (वृत्तसंस्था)

Web Title: Kashyap's 'Golden Smash'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.