कर्नाटक २४४ धावांत गारद

By Admin | Updated: March 18, 2015 02:07 IST2015-03-18T02:07:43+5:302015-03-18T02:07:43+5:30

नमन ओझाचे विक्रमी सहा झेल यांच्या जोरावर शेष भारत संघाने इराणी कप क्रिकेट सामन्यात रणजी चॅम्पियन कर्नाटक संघाचा पहिला डाव मंगळवारी २४४ धावांत गुंडाळला.

Karnataka 244 | कर्नाटक २४४ धावांत गारद

कर्नाटक २४४ धावांत गारद

बंगळुरू : भारतीय कसोटी संघाचा सदस्य असलेला वेगवान गोलंदाज वरुण अ‍ॅरोनची कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी व यष्टिरक्षक नमन ओझाचे विक्रमी सहा झेल यांच्या जोरावर शेष भारत संघाने इराणी कप क्रिकेट सामन्यात रणजी चॅम्पियन कर्नाटक संघाचा पहिला डाव मंगळवारी २४४ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात खेळताना पहिल्या दिवसअखेर शेष भारत संघाने उन्मुक्त चंदला गमावित २० धावा केल्या. कर्नाटकचा कर्णधार विनयकुमारने उन्मुक्तला डावाच्या पहिल्याच चेंडूवर क्लीन बोल्ड केले. आजचा खेळ थांबला त्या वेळी जीवनज्योत सिंग (१६) आणि पारस डोगरा (४) खेळपट्टीवर होते.
त्याआधी, अ‍ॅरोनने ६३ धावांच्या मोबदल्यात ६ बळी घेतले. प्रथम श्रेणी कारकिर्दीत अ‍ॅरोनने डावात प्रथमच सहा बळी घेण्याची कामगिरी केली. ओझाने यष्टीपाठी चमकदार कामगिरी करताना ६ झेल टिपले. त्याने इराणी कप स्पर्धेत एका डावात सर्वाधिक बळी घेणारा यष्टिरक्षक नयन मोंगियाच्या विक्रमाची बरोबरी केली. कर्नाटकने अखेरच्या ६ विकेट केवळ २४ धावांच्या मोबदल्यात गमावल्या.
त्यापूर्वी, शेष भारत संघाने नाणेफेक जिंकून कर्नाटकला प्रथम फलंदाजी दिली. रणजी चॅम्पियन कर्नाटक संघाची सुरुवात निराशाजनक झाली. मयंक अग्रवाल (६८), करुण नायर (५९) आणि अभिषेक रेड्डी (५४) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर कर्नाटक संघाला २०० धावांचा पल्ला ओलांडता आला. या तीन फलंदाजांचा अपवाद वगळता कर्नाटकच्या अन्य फलंदाजांना २० धावांच्या पुढे मजल मारता आली नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Karnataka 244

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.