कांगारूंच्या शिकारीचं बक्षीस, प्रत्येक खेळाडूला 50-50 लाख
By Admin | Updated: March 28, 2017 19:28 IST2017-03-28T19:28:34+5:302017-03-28T19:28:34+5:30
धरमशाला कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव करत 2-1 ने मालिका जिंकली. मालिका विजयाचं बक्षिस म्हणून...

कांगारूंच्या शिकारीचं बक्षीस, प्रत्येक खेळाडूला 50-50 लाख
>ऑनलाइन लोकमत
धरमशाला, दि. 28 - धरमशाला कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट राखून पराभव करत 2-1 ने मालिका जिंकली. मालिका विजयाचं बक्षीस म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने संघातील प्रत्येक खेळाडूला 50 लाख रूपये देण्याची घोषणा केली. याशिवाय मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना 25 लाख आणि अन्य सपोर्ट स्टाफला 15 लाख रूपये देण्याची घोषणा बीसीसीआयने केली.
यापुर्वी कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखल्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून टीम इंडियाला 10 लाख डॉलरचं बक्षीस देण्यात आलं आहे. 1 एप्रिल 2017 पर्यंत जो संघ आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी असेल त्याला आयसीसीकडून बक्षीस देण्यात येतं. बॉर्डर-गावस्कर मालिकेनंतर भारताचं क्रमांक एकचं स्थान अधिक बळकट झालं. त्यानुसार आयसीसीने टीम इंडियाला 10 लाख डॉलरचं बक्षीस दिलं. यापूर्वी बक्षिसाची ही रक्कम पाच लाख डॉलर इतकी होती. मात्र, 2015 पासून ही रक्कम 10 लाख डॉलर इतकी करण्यात आली.
2016-17 च्या मोसमात भारतीय संघ चांगलाच फॉर्ममध्ये आहे. भारताने या मोसमात एकही मालिका गमावली नाही. भारतीय संघाने ऑक्टोबर महिन्यात न्यूझीलंडचा पराभव करत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले होते. भारताने न्यूझीलंडला 3-0 आणि इंग्लंडला 4-0 ने व्हाईटवॉश दिला. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरु-द्धच्या एकमेव कसोटी सामन्यातही भारताने 208 धावांनी विजय मिळवला होता.