जितू रायचा सुवर्णवेध
By Admin | Updated: March 2, 2017 00:10 IST2017-03-02T00:10:15+5:302017-03-02T00:10:15+5:30
उत्कृष्ट वेध साधून येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत बुधवारी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णवेध घेतला.

जितू रायचा सुवर्णवेध
नवी दिल्ली : जितू रायने पुन्हा एकदा एकाग्रतेचा उत्कृष्ट वेध साधून येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत बुधवारी पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुल प्रकारात सुवर्णवेध घेतला. अमनप्रीतसिंग रौप्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. जितू रायने मंगळवारी दहा मीटर पिस्तुलमध्ये कांस्य जिंकल्यानंतर स्पर्धेतील हे दुसरे पदक ठरले.
सेनेचा जवान असलेल्या जितूने कर्णीसिंग शूटिंग रेंजवर २३०.१ असा विश्वविक्रमी स्कोअर नोंदविला. दुसरीकडे, फायनलमध्ये बऱ्याच वेळा आघाडीवर राहिलेल्या अमनप्रीतने २२६.९ गुणांसह विश्वचषक स्पर्धेच्या पदार्पणातच रौप्यपदक जिंकण्याची किमया केली. इराणचा नेमबाज वाहीद गोलखांदन २०८.० गुणांसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला.
पहिल्या दोन फेऱ्यांनंतर अंतिम फेरी गाठणारा २९ वर्षांचा जितू ८ नेमबाजांमध्ये सहाव्या स्थानावर होता. त्यानंतर बाद फेरीत १०.८ गुण नोंदविताच तो सहाव्यावरून तिसऱ्या स्थानावर आला; शिवाय कझाकिस्तानच्या नेमबाजाला त्याच्यामुळे बाहेर व्हावे लागले. त्यानंतरच्या पुढील २ फेऱ्यांमध्ये आणखी सरस कामगिरीसह जितू पहिल्या स्थानावर पोहोचला. अमनप्रीत माघारताच त्याला
दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पूजा घाटकरने विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. अंकुर मित्तलने ट्रॅपमध्ये रौप्य आणि रायने दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात कांस्य जिंकले होते. राय आणि हिना सिद्धू यांच्या जोडीने मिश्र सांघिक प्रकारात अव्वल स्थान पटकावले होते; पण ही केवळ चाचणी स्पर्धा असल्याने पदक विचारात घेतले जात नाही. (वृत्तसंस्था)
>सुवर्ण जिंकल्यानंतर जितू म्हणाला, ‘‘माझी सुरुवात खराब झाली; पण खेळात चढउतार चालायचेच. मला खेळातील अनिश्चितता चांगली वाटते. असे झाले नाही, तर खेळातील रोमांचकपणा संपुष्टात येईल. २०१६च्या सत्राचा शेवट मी विश्वचषकात रौप्य विजयाने केला होता. २०१७ मध्ये देशासाठी शानदार सुरुवात करण्याचे स्वप्न पाहिले होते. यंदादेखील म्युनिच विश्वचषकात सहभागी होण्याचे स्वप्न जोपासले आहे.’’ ५५९ रायने याआधी पात्रता फेरीत ५५९ गुण मिळविल्याने आघाडीवर असलेल्या अमनप्रीतच्या (५६१ गुण) तुलनेत तो माघारला होता.
>महिलांच्या २५ मीटर रॅपिड
फायर पिस्तुलमध्ये मुस्कान ५७६ गुणांसह १२ व्या आणि राही सरनोबत २३व्या स्थानावर राहिल्या. महिला स्कीट प्रकारात रश्मी राठोड १७ व्या, आरती सिंग २४ व्या आणि सानिया शेख २७ व्या स्थानावर राहिल्या.
>देशात प्रथमच आयोजित विश्वचषकात चाहत्यांपुढे सुवर्ण जिंकणे शानदार ठरले. हा मोठा सन्मान आहे. भारतीय तिरंगा उंचावताना पाहणे सुखद वाटते.
- जितू राय, सुवर्णविजेता