World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 08:34 IST2025-09-14T08:32:37+5:302025-09-14T08:34:44+5:30
Jasmine Lamboriya Clinches Gold: भारताच्या जास्मिन लांबोरिया हिने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
२०२५ मध्ये लिव्हरपूल येथे सुरू असलेल्या जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या जास्मिन लांबोरिया हिने जबरदस्त कामगिरी करत ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. हा विजय केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर भारतासाठीदेखील ऐतिहासिक ठरला. या हंगामात भारताने पहिलेच सुवर्णपदक जिंकले.
Jasmine Lamboriya clinches Gold at the World Boxing Championship in Liverpool.
— ANI (@ANI) September 14, 2025
Source: Boxinf Federation Of India pic.twitter.com/6o2grqakuz
अंतिम फेरीत जास्मिनचा सामना पोलंडच्या ज्युलिया सेमेटाशी झाला, जी पॅरिस २०२४ ऑलिंपिकची रौप्यपदक विजेती आहे. हा सामना खूपच चुरशीचा ठरला. पहिल्या फेरीत जास्मिन थोडी संघर्ष करताना दिसली. मात्र, दुसऱ्या फेरीत तिने जबरदस्त पुनरागमन केले आणि सामना जिंकला. जास्मिनने ज्युलिया सेमेटाचा ४-१ अशा फरकाने पराभव केला.
जास्मिन लांबोरियाची प्रतिक्रिया
"मी ही भावना शब्दांत मांडू शकत नाही. विश्वविजेतेपद मिळवणे माझ्यासाठी खूप मोठे आहे. पॅरिस ऑलिंपिकमध्ये लवकर बाहेर पडल्यावर मी माझ्या खेळात शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप सुधारणा केली. या सुवर्णपदकामागे गेल्या वर्षभरातील कठोर मेहनत आहे."
पॅरिस ऑलिंपिकमधून धडा
२०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये जास्मिनची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती, आणि तिला सुरुवातीलाच स्पर्धेबाहेर पडावे लागले. मात्र, त्या अपयशातून शिकून तिने तिच्या तंत्रात सुधारणा करत जागतिक पातळीवर आपली छाप पाडली. जास्मिनचा हा विजय भारतीय महिला बॉक्सिंगसाठी मैलाचा दगड ठरला आहे. जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावण्यात तिचा मोठा वाटा असून, हा विजय आगामी ऑलिंपिकसाठी भारताच्या तयारीसाठी महत्त्वाचा ठरेल.