आंतरराष्ट्रीय पिकलबॉल; भारतीय खेळाडू थायलंडमध्ये चमकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 04:13 IST2020-03-02T04:13:15+5:302020-03-02T04:13:22+5:30
थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत एका सुवर्ण पदकासह एकूण ५ पदकांची कमाई करत अभिमानाने तिरंगा फडकाविला.

आंतरराष्ट्रीय पिकलबॉल; भारतीय खेळाडू थायलंडमध्ये चमकले
मुंबई : भारतीय खेळाडूंनी आपल्या चमकदार खेळाच्या जोरावर नुकत्याच थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पिकलबॉल स्पर्धेत एका सुवर्ण पदकासह एकूण ५ पदकांची कमाई करत अभिमानाने तिरंगा फडकाविला. कस्तुरी विघ्नेने एक सुवर्ण व २ रौप्य पदक जिंकून आपला विशेष ठसा उमटविला. भारतीय संघात मनीष राव, सुनील जोशी, कादंबरी पाटील, शिवानी सुरतकळ व कस्तुरी यांचा समावेश होता.
हुआ हिन शहरात थायलंड पिकलबॉल संघटनेच्या वतीने झालेल्या या स्पर्धेत भारतासह एकूण २० देशांचा सहभाग होता. मिश्र गटात भारतीयांचे वर्चस्व दिसून आले. कस्तुरीने मिश्र दुहेरीत सुनील जोशीसह खेळताना अंतिम फेरीत सुवर्ण पदकावर कब्जा केला. कस्तुरी-सुनील यांनी एकतर्फी झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्याच कादंबरी पाटील आणि तिचा इंग्लंडचा साथीदार ख्रिस जेम्स यांचा १५-७ असा पराभव केला.
महिला एकेरीत कस्तुरीला अंतिम सामन्यात सिंगापूरच्या विनेशा चॅनविरुद्ध १-१५ असा मोठा पराभव पत्करावा लागला. तसेच, महिला दुहेरीत सिंगापूरच्या खेळाडूसह खेळताना कस्तुरीचा लुईस स्टीफन्स-सु हॅरिस या इंग्लंडच्या जोडीकडून ४-१५ अस्सा पराभव झाला. यामुळे तिला दोन्ही गटांमध्ये रौप्य पदकावर समाधान मानाव लागले.
पुरुष दुहेरीत मनीष राव-सुनील या अनुभवी खेळाडूंनी शानदार खेळ केला. अटीतटीच्या सामन्यात त्यांनी कोरी कार्लसन-डेव्हिड बौडेन या अमेरिकन जोडीला १५-९ असे नमवत कांस्य पदकावर नाव कोरले.
>मनिष रावचा ‘पंच’
स्पर्धेत सहभागी झालेला भारताचा सर्वात अनुभवी खेळाडू मनिष रावने पाचवे आंतरराष्ट्रीय पदक मिळवताना छाप पाडली. याआधी त्याने अमेरिकन स्पर्धेत २, तर बँकॉक आणि जर्मन ओपन स्पर्धेत प्रत्येकी एक पदक जिंकले होते. याशिवाय सुनील जोशीचे हे जर्मन ओपननंतर दुसरे आंतरराष्ट्रीय पदक असून कस्तुरी व कादंबरी यांनी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पदकाची कमाई केली.