भारताचा विजय हुकला
By Admin | Updated: August 5, 2016 04:03 IST2016-08-05T04:03:58+5:302016-08-05T04:03:58+5:30
चेस (१३७*) याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने पराभवाच्या रस्त्यावरून मार्ग काढताना भारताविरुद्धची दुसरी कसोटी अनिर्णित राखली.

भारताचा विजय हुकला
किंगस्टन : आपल्या कारकिर्दीतील केवळ दुसराच कसोटी सामना खेळत असलेला युवा अष्टपैलू रोस्ट चेस (१३७*) याने झळकावलेल्या शानदार शतकाच्या जोरावर वेस्ट इंडीजने पराभवाच्या रस्त्यावरून मार्ग काढताना भारताविरुद्धची दुसरी कसोटी अनिर्णित राखली. शेन डार्विचने (७४) देखील जबरदस्त अर्धशतक झळकावून चेसला चांगली साथ दिली. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या १४४ धावांच्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर यजमानांनी भारतीयांना सलग दुसऱ्या विजयापासून दूर ठेवले. विंडीजने दुसऱ्या डावात ६ बाद ३८८ धावा केल्या.
सबिना पार्क मैदानावर झालेल्या या सामन्यात पहिल्या डावात ३०४ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर विंडीजची दुसऱ्या डावाची सुरुवातही अडखळती झाली. चौथ्या दिवशी यजमानांनी ४८ धावांवर ४ खंदे फलंदाज गमावले होते. नेमकी याच वेळी अष्टपैलू चेसने विक्रमी खेळी करताना संघाला केवळ सावरलेच नाही, तर पराभवापासूनही दूर नेले. गोलंदाजीत ५ बळी घेतल्यानंतर फलंदाजीमध्ये शानदार शतक झळकावताना चेसने सामनावीरच्या पुरस्कारावर कब्जा केला. त्याने १६९ चेंडूंमध्ये १५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद १३७ धावांचा तडाखा दिला. विशेष म्हणजे चेसचे हे कसोटीतील पहिले शतक ठरले.
दखल घेण्याची बाब म्हणजे, दुसऱ्यांदा विंडीज खेळाडूने एकाच सामन्यात ५ बळी व शतक अशी विक्रमी अष्टपैलू खेळी केली आहे. चेसच्याआधी असा पराक्रम महान अष्टपैलू गॅरी सोबर्स यांनी इंग्लंडविरुद्ध लॉडर््स मैदानावर केला होता. चेसने जेरेमी ब्लॅकवूडसह (६३) पाचव्या विकेटसाठी ९३ धावांची, तर शेन डार्विचसह सहाव्या विकेटसाठी १४४ धावांची जबरदस्त भागीदारी केली.
भारत पुनरागमन करणार असे दिसत असताना विंडीज कर्णधार जेसन होल्डरने जम बसलेल्या चेसला योग्य साथ देताना नाबाद ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी नाबाद १०३ धावांची भागीदारी करून बरोबरी मान्य करण्यास भारतीयांना भाग पाडले. अंतिम दिवशी भारताला केवळ दोन बळी घेण्यात यश आले. (वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडीज (पहिला डाव) : सर्व बाद १९६. भारत (पहिला डाव) : ९ बाद ५००. वेस्ट इंडीज (दुसरा डाव) : १०४ षटकांत ६ बाद ३८८ (ब्रेथवेट २३, ब्रावो २०, ब्लॅकवूड ६३, रोस्ट चेस नाबाद १३७, शेन डॉर्विच ७४, जेसन होल्डर नाबाद ६४, मोहम्मद शमी २/८२, मिश्रा २/९०, ईशांत १/५६, आश्विन १/११४.