डकार २०२६ साठी भारताचा निर्धार; संजय टकले पुन्हा एकदा जागतिक आव्हानासाठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 17:48 IST2025-12-22T17:45:35+5:302025-12-22T17:48:00+5:30
ते मोजक्या भारतीय चालकांपैकी एक

डकार २०२६ साठी भारताचा निर्धार; संजय टकले पुन्हा एकदा जागतिक आव्हानासाठी सज्ज
India's Sanjay Takale prepares for Dakar Rally 2026 : जगातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित रॅली-रेड स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डकार रॅलीत भारत पुन्हा एकदा झेंडा फडकावण्यास सज्ज झाला आहे. अनुभवी मोटरस्पोर्ट खेळाडू आणि एरपेस रेसर संजय टकले डकार रॅली २०२६ मध्ये दुसऱ्यांदा सहभाग नोंदवणार असून, भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
ते मोजक्या भारतीय चालकांपैकी एक
अत्यंत प्रतिकूल हवामान, दीर्घ पल्ल्याचे टप्पे आणि यांत्रिक तसेच मानसिक कसोटी यांसाठी प्रसिद्ध असलेली डकार रॅली ही मानव आणि यंत्र यांची अंतिम परीक्षा मानली जाते. या कठीण स्पर्धेत संजय टकले यांचा सहभाग भारतासाठी अभिमानास्पद मानला जात आहे. आंतरराष्ट्रीय रॅली क्षेत्रातील त्यांचा अनुभव, शिस्तबद्ध तयारी आणि सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे ते डकारमध्ये सहभागी होणाऱ्या मोजक्या भारतीय चालकांपैकी एक ठरले आहेत.
अनुभवाची शिदोरीसोबत असल्यामुळे यंदाची स्पर्धा ठरेल खास
मागील डकार स्पर्धेत संजय टकले यांनी एकूण १८ वे स्थान पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली होती. ही कामगिरी जागतिक मोटरस्पोर्ट क्षेत्रात भारतासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. यंदाच्या डकार मोहिमेला टकले “डकार २.०” असे संबोधतात. ज्यात अधिक सखोल नियोजन, अनुभवातून मिळालेली शहाणपणाची जोड आणि नव्या उद्दिष्टांचा स्पष्ट आराखडा आहे. मोटरसायकल रेसिंगपासून कार रॅली आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांपर्यंतचा ३५ वर्षांहून अधिक प्रदीर्घ प्रवास संजय टकले यांना डकार २०२६ स्पर्धेसाठी अधिक सक्षम बनवत आहे. तांत्रिक समज, मानसिक तयारी आणि अनुभवाची शिदोरी यामुळे ते यंदा अधिक आत्मविश्वासाने स्पर्धेत उतरतील.
फ्रान्सच्या कंपेन शारन कडून तांत्रिक सहाय्य
आपला अनुभव सांगताना संजय टकले म्हणाले, “माझी पहिली डकार ही एक विलक्षण अनुभूती होती. डकार तुम्हाला पूर्णपणे बदलून टाकते. एकदा ती रेस केल्यानंतर तुम्ही कधीच पूर्वीसारखे राहत नाही. ती मानसिकदृष्ट्या आव्हान देते, तुम्हाला खचवते आणि मग पुन्हा उभं राहण्याची, शिस्तीची आणि खऱ्या अर्थाने लढण्याची शिकवण देते. मी केवळ अधिक मजबूत ड्रायव्हर म्हणूनच नव्हे, तर एक वेगळा माणूस म्हणून परतलो. यंदा माझे उद्दिष्ट स्पष्ट आहे. डकार पुन्हा पूर्ण करणे आणि माझी कामगिरी लक्षणीयरीत्या सुधारणे. मी पुन्हा एकदा माझ्या एरपेस रेसर्स संघासाठी स्पर्धा करणार असून, फ्रान्सच्या कंपेन शारन कडून तांत्रिक सहाय्य मिळणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी भारताकडून एकमेव फोर-व्हीलर एन्ट्री असल्याचा मला अभिमान आहे. माझे ध्येय फिनिश लाईन गाठणे आणि अधिक मजबूतपणे स्पर्धा पूर्ण करणे हेच आहे.”
ही फक्त स्पर्धा नव्हे तर एरपेसच्या कार्यपद्धतीचे मूलभूत तत्त्व
स्पर्धात्मक रेसिंगबरोबरच संजय टकले हे एरपेस इंडस्ट्रीजचे संचालक म्हणूनही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांच्या मते, मोटरस्पोर्ट हे अचूक नियोजन, सहनशक्ती, प्रणालीगत विचार आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी यांचे जिवंत उदाहरण आहे. जे एरपेसच्या कार्यपद्धतीचेही मूलभूत तत्त्व आहे. डकार रॅली २०२६ जवळ येत असताना, संजय टकले यांची ही मोहीम केवळ एक स्पर्धा न राहता, जागतिक मोटरस्पोर्ट क्षेत्रात भारताची वाढती ताकद, जिद्द आणि क्षमतेचे प्रतीक म्हणून पाहिली जात आहे.