भारताचा मार्ग खडतर
By Admin | Updated: September 12, 2014 02:08 IST2014-09-12T02:08:19+5:302014-09-12T02:08:19+5:30
शुक्रवारपासून प्रारंभ होत असलेल्या डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत यजमान भारताला जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचविना येथे दाखल

भारताचा मार्ग खडतर
बेंगळुरू : शुक्रवारपासून प्रारंभ होत असलेल्या डेव्हिस कप टेनिस स्पर्धेत यजमान भारताला जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या नोव्हाक जोकोव्हिचविना येथे दाखल झालेल्या सर्बिया संघाच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. भारताला या लढतीत सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.
भारताने २०१० मध्ये अंतिम १६ मध्ये अखेरचा प्रवेश नोंदविला होता. त्या वेळी सर्बिया संघाने भारताला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळायला लावताना ४-१ ने विजय मिळविला होता. भारताला आता पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे; पण ही सोपी बाब नाही, याची यजमान संघाला चांगली कल्पना आहे.
जोकोव्हिचविना खेळणाऱ्या सर्बिया संघात यांको टिप्सारेव्हिच व व्हिक्टर ट्रोइकी यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. हे खेळाडू भारतीय संघाचा विजयात अडथळा निर्माण करण्यास सक्षम आहेत. भारताचा एकेरीतील अव्वल खेळाडू सोमदेव देववर्मनची गेल्या सहा महिन्यांतील कामगिरी निराशाजनक आहे. एटीपी सर्किटमध्ये त्याला पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीच्या पुढे मजल मारता आलेली नाही.
दुसऱ्या बाजूचा विचार करता एकेरीमध्ये सर्बियाचे आव्हान सांभाळणारा डुसान लाजोव्हिच शानदार फॉर्मात आहे. जागतिक क्रमवारीत ६१ व्या स्थानावर असलेल्या खेळाडूने त्याच्यापेक्षा खालचे मानांकन असलेल्या खेळाडूंविरुद्ध केवळ चार सामने गमाविले आहेत.
सोमदेवने शांघाय चॅलेंजर्समध्ये एकेरी व दुहेरीमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती. अनुभवी सोमदेव प्रतिस्पर्ध्यांपुढे आव्हान निर्माण करण्यास सक्षम आहे. डेव्हिस कप स्पर्धेत त्याची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय ठरली आहे. भारताला त्याच्याकडून या वेळीही चमकदार कामगिरीची आशा आहे. (वृत्तसंस्था)