भारताचे मिशन ‘वर्ल्डकप’
By Admin | Updated: October 8, 2014 03:17 IST2014-10-08T03:17:16+5:302014-10-08T03:17:16+5:30
वेस्ट इंडीजविरुद्ध उद्या, बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ वर्चस्व राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.

भारताचे मिशन ‘वर्ल्डकप’
कोची : वेस्ट इंडीजविरुद्ध उद्या, बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या पाच वन-डे सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघ वर्चस्व राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. पुढील वर्षी आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडच्या संयुक्त यजमानपदाखाली आयोजित होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेची तयारी या मालिकेतून भारत करणार आहे. एका अर्थाने भारताच्या मिशन वर्ल्डकपला बुधवारपासून सुरवात होत आहे.
भारताने विंडीजला २००६-०७ नंतर गेल्या पाच मालिकेत पराभूत केले आहे. त्यात विंडीजमध्ये खेळल्या गेलेल्या तीन मालिकांचा समावेश आहे. भारत या मालिकेत कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारताला विंडीजचे आव्हान मोडून काढताना विशेष अडचण भासणार नाही, अशी आशा आहे. फिरकीपटू सुनील नरेनच्या अनुपस्थितीत विंडीज संघाची गोलंदाजीची बाजू कमकुवत झाली आहे. चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धेत नरेनवर त्याची गोलंदाजी शैली संशयास्पद असल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यामुळे त्याला या मालिकेतून वगळण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कॅरेबियन रन मशीन ख्रिस गेलचा संघात समावेश नाही. पहिल्या वन-डे लढतीवर पावसाचे सावट असले तरी चाहत्यांना मात्र उत्सुकता आहे.
यजमान संघ या मैदानावर १-० ने आघाडी मिळविण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने भारतासाठी ही मालिका महत्त्वाची आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ समतोल भासत आहे.
विराट कोहलीचा फॉर्म संघासाठी एकमेव चिंतेचा विषय आहे. निवड समितीने दुखापतग्रस्त रोहित शर्माच्या स्थानी मुरली विजयची निवड केली आहे; पण शिखर धवनच्या साथीने डावाची सुरुवात कोण करणार, मुरली विजय की अजिंक्य रहाणे? याबाबत उत्सुकता आहे. विराटला या मालिकेत सूर गवसेल अशी आशा आहे. सुरेश रैना, अंबाती रायडू व महेंद्रसिंग धोनी यांच्या समावेशामुळे मधली फळी बळकट आहे. गोलंदाजीमध्ये मोहित शर्मा शानदार फॉर्मात आहे. मोहितने चेन्नई सुपरकिंग्जचे प्रतिनिधित्व करताना चॅम्पियन्स लीग स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. ९ वर्षीय फिरकीपटू कुलदीप यादव याला संधी मिळते का, याबाबत उत्सुकता आहे.
दुसऱ्या बाजूचा विचार करता, विंडीज संघाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. विंडीज संघाने अलीकडेच बांगलादेशचा पराभव केला. विंडीज संघातील १५ पैकी ७ खेळाडंूना येथे आयपीएल व चॅम्पियन्स लीग स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात डॅरेन सॅमीच्या स्थानी ड्वेन ब्राव्होकडे कर्णधारपद सोपविण्यात आले होते. (वृत्तसंस्था)