भारताचा जीतू राय आॅलिम्पिकसाठी पात्र

By Admin | Updated: September 10, 2014 02:41 IST2014-09-10T02:41:41+5:302014-09-10T02:41:41+5:30

भारताचा नवा पिस्तुल किंग आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन जीतू राय याने स्पेनच्या ग्रेनाडा येथे सुरू

India's Jitu Rai is eligible for the Olympics | भारताचा जीतू राय आॅलिम्पिकसाठी पात्र

भारताचा जीतू राय आॅलिम्पिकसाठी पात्र

नवी दिल्ली : भारताचा नवा पिस्तुल किंग आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन जीतू राय याने स्पेनच्या ग्रेनाडा येथे सुरू असलेल्या ५१ व्या आयएसएसएफ विश्व नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या ५० मीटर पिस्तुल इव्हेंटमध्ये रौप्य पदक पटकाविताना २०१६ च्या रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविली. जीतू आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारा भारताचा पहिला नेमबाज ठरला. सेनेच्या या २५ वर्षीय नेमबाजाचे सुवर्णपदक थोड्या फरकाने हुकले. जीतूने अंतिम फेरीत २० शॉटमध्ये १९१.१ चा स्कोअर नोंदविला तर दोनदा आॅलिम्पिक चॅम्पियन असलेल्या दक्षिण कोरियाच्या विश्व विक्रमवीर जिन जिंगोहने १९२.३ गुणांची कमाई करीत सुवर्णपदकाचा मान मिळविला. चीनच्या आॅलिम्पिक चॅम्पियन पेंग वेई याला या स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. होआंग जुआन विन्ह चौथ्या स्थानावर राहिला. त्याने अखेरचा आॅलिम्पिक कोटा मिळविला.
आयएसएसएफ विश्व रॅन्किंगमध्ये पाचव्या स्थानावर असलेल्या जीतूची यंदाच्या मोसमातील कामगिरी उल्लेखनीय आहे. त्याने ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. जीतूने विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदकाचा मान मिळवित २०१४ मध्ये सलग पाचवे आंतरराष्ट्रीय पदक पटकाविले.
दरम्यान, अयोनिका पॉल हिने महिलांच्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले. राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकाविणाऱ्या अयोनिकाने ६२०.८ गुणांची कमाई करताना अव्वल स्थान पटकावित अंतिम फेरीसाठी पात्रता मिळविली. महिला एअर रायफल स्पर्धेत ६ स्पर्धकांना आॅलिम्पिकसाठी प्रवेश निश्चित करण्याची संधी आहे.
५० मीटर पिस्तुल स्पर्धेत राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य पदक विजेत्या गुरपाल सिंगला ६०० पैकी ५५० गुण पटकाविता आले. त्याला ३३ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. ओमप्रकाश (५४८ गुण) ३८ व्या स्थानी राहिला. ट्रॅप स्पर्धेतील माजी विश्व चॅम्पियन मानवजित संधूने परफेक्ट कामगिरी करताना चार पात्रता फेरीत १०० पैकी १०० चा स्कोअर नोंदविला.
भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रणइंदर सिंग यांनी जीतूचे अभिनंदन केले. आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारा तो पहिला भारतीय नेमबाज ठरला, असेही रणइंदर सिंग म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: India's Jitu Rai is eligible for the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.